अनाथाश्रमातील आठ मुलींवर बलात्कार करणाऱ्या तिघांना सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:27 AM2020-03-05T05:27:51+5:302020-03-05T05:27:55+5:30
अनाथाश्रमातील आठ अल्पवयीन मुलींवर बलात्कार व लैंगिक अत्याचार करणा-या तिघांना सोमवारी पनवेल येथील सत्र न्यायालयाने अनुक्रमे १४, १० व एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
मोहोपाडा/ पनवेल : चांभार्ली येथील ‘शांती ऑर्फनेज’ या अनाथाश्रमातील आठ अल्पवयीन मुलींवर बलात्कार व लैंगिक अत्याचार करणा-या तिघांना सोमवारी पनवेल येथील सत्र न्यायालयाने अनुक्रमे १४, १० व एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. ख्रिस्टियन राजेंद्रन (२४) व दुसरा मुलगा जॉय राजेंद्रन (१९) व सलोमी राजेंद्रन अशी आरोपींची नावे आहेत.
चांभार्ली येथे ‘चर्च आॅफ एव्हरलास्टिंग लाइफ अॅण्ड सोशल वेल्फेअर ट्रस्ट’च्या माध्यमातून अनाथ मुला-मुलींसाठी ‘शांती आॅर्फनेज’ हे अनाथालय सुपन राजेंद्रन हे पत्नी व दोन मुलांसह चालवत होते. ‘शांती आॅर्फनेज’चे चालक सुपन राजेंद्रन यांचा मुलगा ख्रिस्टियन राजेंद्रन (२४) व दुसरा मुलगा जॉय राजेंद्रन (१९) दोघांनी आॅर्फनेजमध्ये राहणाºया आठ अल्पवयीन मुलींवर बलात्कार व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. लैंगिक छळ असह्य झाल्याने येथील एका पीडित मुलीने त्यांच्यावरील लैंगिक छळाची माहिती वर्गशिक्षिकेला दिली. त्यामुळे या वर्गशिक्षिकेने या प्रकाराची माहिती बाल कल्याण समितीला दिली. त्यानंतर बालकल्याण समितीच्या सदस्यांनी एप्रिल २०१५ मध्ये प्रत्यक्ष ‘शांती आॅर्फनेज’ला भेट देऊन तिथे असलेल्या पीडित मुलांची सुटका करून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर रसायनी पोलिसांनी पीडित मुलींच्या वतीने ख्रिस्टियन आणि जॉय या दोघा भावांविरोधात बलात्कारासह अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, विनयभंग, मारहाण करणे, त्याचप्रमाणे पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
या खटल्याची सुनावणी सुरुवातीला अलिबाग अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्षा मोहित यांच्या न्यायालयात झाली. त्यानंतर पनवेल येथील सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण २१ साक्षीदारांची साक्ष नोंदविली.
>दंडाची रक्कम मुलींना देणार
ख्रिस्टियन राजेंद्रनला १४ वर्षे सश्रम कारावास व ८५ हजार दंड तसेच जॉय राजेंद्रनला दहा वर्षे सश्रम कारावास आणि ३५ हजार रुपये दंड तर पोलिसांना न कळविणाºया सलोमी राजेंद्रनला एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपींकडून मिळणारी दंडाची सर्व रक्कम पीडित मुलींना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.