पर्यावरणासाठी तीन देशांचा सायकल प्रवास; सायकलपटू वंदना भावसारचा पराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:53 PM2020-03-07T23:53:49+5:302020-03-07T23:54:11+5:30
तीस दिवसांत कापले २०२० किमी अंतर
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. जगभरात ही समस्या भेडसावत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. त्यापैकी पनवेल येथील वंदना भावसार या एक आहेत. त्यांनी मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर अशा तीन देशांमध्ये सायकल प्रवास करून झीरो कार्बनचा संदेश दिला. वंदना यांनी तीन देशांत दोन सहकाऱ्यांसह सायकलवरून २०२० किमी अंतर पार केले आहे.
विचुंबे येथील रहिवासी असलेल्या वंदना भावसार एका शाळेमध्ये नोकरी करीत होत्या. त्यांना ट्रेकिंगची आवड होती. मात्र महिलांना सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकलिंग सुरू केले. पनवेल-गोवा त्यानंतर शिर्डी, मनाली, कारगिल, कच्छ, द्वारका, दिव, नवापूर ते महाबळेश्वर असा सायकल प्रवास त्यांनी केला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांवरही त्यांनी सायकलसवारी केली.
भारताबरोबरच अन्य देशही पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवीत आहेत, त्यात आपणही सहयोग नोंदवावा, या उद्देशाने केरळच्या अजिता बाबुराज आणि बडोद्याच्या पिनल पार्लेकर या दोघींसह मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर या देशांमध्ये सायकलिंग करण्याचा दृढनिश्चय केला. आणि २८ जानेवारीला त्या तिघी रवाना झाल्या. झीरो कार्बन फूट प्रिंट हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी थायलंडमध्ये ११ दिवस सायकलिंग केले.
ठिकठिकाणी जंगी स्वागत
थायलंडनंतर त्यांनी मलेशियात बारा दिवस प्रवास केला. त्यांच्या तीन देशांच्या सायकल प्रवासाचे सर्वत्र स्वागत झाले. त्यानंतर सिंगापूरमधील हवामान, नियम, कायदे, तेथील माणसे सर्व भिन्न असतानाही त्यांच्या प्रवासात खंड पडला नाही. एक महिना कुटुंबीयांपासून दूर राहून त्यांनी जवळपास दोन हजार किमीपेक्षा जास्त सायकल प्रवासाचे आवाहन सहज पेलले. यासाठी समिधा फाउंडेशन पनवेलचे त्यांना सहकार्य लाभले.