‘जलयुक्त’च्या कामासाठी तीन कोटीं
By admin | Published: April 28, 2017 12:19 AM2017-04-28T00:19:37+5:302017-04-28T00:20:39+5:30
ग्रामीण भागातील डोंगर, दुर्गम भागात मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गतवर्षी
रोहा : ग्रामीण भागातील डोंगर, दुर्गम भागात मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गतवर्षी तीन गावातील ११५ कामांकरिता २ कोटी ५८ लाख ८४ हजार रुपयांची तरतूद केली होती. यंदा या योजनेसाठी शासनाने रोहे तालुक्यावर मेहरनजर टाकली आहे. यावर्षी ४ गावातील १२६ विविध कामांकरिता ३ कोटी ६३ लाख २७ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. राज्य शासनाने नुकत्याच या कामांना मंजुरी देत निधीची तरतूद केली आहे.
या अभियानाची वनखाते, कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा या शासनाच्या विभक्त खात्याची संयुक्त जबाबदारी असताना या अभियानाला खुद्द वनखात्याने खोडा घातला आहे. तर ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा विभाग या दोन्ही विभागांनी पूर्णपणे कानाडोळा केल्याने एकट्या कृषी विभागावर या अभियानाचा भार पडला आहे. या अभियानाकरिता शासनाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असली तरी विविध खात्यांच्या इच्छाशक्तीअभावी पाण्यासारखे पुण्य मिळवून देणाऱ्या अभियानाला ब्रेक लावण्याचे काम वनसंपदा व जलसंपदा आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजना या विभागाकडून होत आहे.
‘सर्वांसाठी पाणी’ हे ब्रीद हाती घेऊन राज्य शासनाने गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. २०१५-१६ या पहिल्या वर्षात रोहे तालुक्यातील विरझोली, खोपे (धोंडखार), पाथरशेत या तीन गावांचा समावेश होतो. तर यंदा वाली, पाटणसई- चिकणी, खांबेरे-टेमघर, भालगाव या चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लोकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून सिमेंट बंधारे, वळण बंधारे, मातीला बांध बांधणे, डोंगराळ आडवी चर, अनगड दगडी बांध आदी विविध कामे या अभियानाअंतर्गत करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे हे अभियान कृषी विभाग, वनखाते, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा विभाग या चार विभागांनी एकत्र येवून मार्गी लावण्याचे बंधनकारक असताना वनखाते, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा विभाग या विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने अनेक ठिकाणी कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. तर दुसरीकडे एकट्या कृषी विभागाच्या खांद्यावर भार पडल्याने जलयुक्त शिवार अभियानाचे काम कासव गतीने होत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
रोहा तालुक्यातील चिकणी-पाटणसई विभागातील ३ मंजूर सिमेंट बंधाऱ्यापैकी २ बंधाऱ्यांच्या कामांवर वनविभागाने हरकत घेतली आहे. तर उर्वरित एका कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने सुरक्षा रक्कम न भरल्याने हे काम कागदोपत्री रखडले आहे. या विभागात एकूण ५६ कामे मार्गी लावण्याची आशा होती व कामाकरिता १ कोटी २६ लाख ९६ हजार रू. अंदाजपत्रक तयार आहे.
वाली येथील एकूण २२ कामांसाठी ७९ लाख ६२ हजार रूपयांचे अंदाजपत्रक तयार आहे. या कामांची निविदा प्रक्रि या सुरू आहे. भालगाव विभागात एकूण २६ कामे असून या कामांकरिता ७४ लाख १८ हजार रूपयांचे अंदाजपत्रक काढण्यात आले आहे. चणेराजवळील खांबरे, टेमघर या भागातील एकूण२२ कामांना मंजुरी देत ८२ लाख ५१ हजार रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. एकंदरीत वरील नमूद चार गावांकरिता ३ कोटी ६३ लाख २७ हजार रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.