अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवस मुदतवाढ

By admin | Published: November 12, 2016 06:39 AM2016-11-12T06:39:35+5:302016-11-12T06:39:35+5:30

रायगड जिल्हा न्यायालयात दाखल एका निवडणूक याचिकेमुळे अलिबाग नगरपरिषदेच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेस तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे

Three days extension for withdrawal of application | अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवस मुदतवाढ

अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवस मुदतवाढ

Next

अलिबाग : रायगड जिल्हा न्यायालयात दाखल एका निवडणूक याचिकेमुळे अलिबाग नगरपरिषदेच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेस तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, अलिबाग नगरपरिषदेकरिता मतदान रविवार, २७ नोव्हेंबर रोजी नियोजित निवडणूक कार्यक्रमाप्रमाणेच होईल, अशी माहिती अलिबाग नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अलिबागचे नगराध्यक्षपदाचे शेकापचे उमेदवार विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि शेकापचे नगरसेवकपदाचे उमेदवार अनिल चोपडा यांच्या उमेदवारीस आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर ठाकूर यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. त्यांची प्रथम सुनावणी गुरुवारी झाली. शुक्रवारी उर्वरित सुनावणी व निर्णय अपेक्षित होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती; परंतु तोपर्यंत याचिकेबाबतचा निर्णय झाला नाही. परिणामी, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीस तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सोनावणे यांनी सांगितले.
आता न्यायालयीन निकाल ज्या दिवशी प्राप्त होईल त्या दिवशीपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेस आयोगाच्या नियमानुसार तीन दिवसांची मुदतवाढ लागू होईल, असेही सोनावणे यांनी स्पष्ट केले. उमेदवार आपला निवडणूक प्रचार या काळात करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. सोमवारी न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे.


रोह्यात नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात
1रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीमध्ये शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी ७ उमेदवार रिंगणात असून नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे रोहा नगरपरिषद निवडणुकीमध्ये बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.रोहा नगरपरिषद निवडणुकीत काही जागा वगळता बहुतांशी ठिकाणी तिरंगी अथवा बहुरंगी लढती होणार आहे. 2 नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे संतोष पोटफोड, शिवसेना पुरस्कृत संदीप अनिल तटकरे, विद्यमान नगराध्यक्ष समीर शेडगे, भाजपाचे मोतीलाल ह. जैन, माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, विनेश शिंदे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असून बहुजन मुक्ती मोर्चातर्फे सदर आयुब गजगे आपले नशीब आजमावीत आहेत. नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी निवडणूक होणार
आहेत. 3शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम वेळेपर्यंत प्रभाग क्र १ ब मधून नारायण खुळे, प्रभाग क्र २ मधून फर्जंद अली रोगे, जमिर कर्जीकर, अ. कादिर रोगे, प्रभाग ३ सनाउल्ला दर्जी, प्रभाग 3 ब अवनी शेडगे, प्रभाग ६ अ श्रृती महेंद्र चाळके, प्रभाग क्र ६ ब मधून परशुराम चव्हाण व अशोक तेंडूलकर, प्रभाग क्र ७ ब मधून बाळाराम धामणसे यांनी तर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून डॉ. फरिद चिमावकर आणि नारायण खुळे यांनी माघार घेतली आहे. 4काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात पक्षातीलच अनेकांनी बंड पुकारत उमेद्वारी अर्ज कायम ठेवल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे निवडणूक प्रचारात मोठी रंगत येणार आहे. या निवडणुकीच्या प्रचार ही आत्ता जोरात सुरु होणार असून कोणत्या पक्षाचे दैव बलवत्तर आहे, हे निवडणुकीच्या मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. बहुरंगी लढत होणार असल्याने साऱ्यांचीच उत्सुक्ता वाढली आहे. रोहेकरांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.


महाडमध्ये शिवसेना-काँग्रेस मुख्य लढत
महाड : नगराध्यक्षपदासाठी तीन, १७ नगरसेवकांच्या जागांसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. सत्ताधारी काँग्रेस विरोधात शिवसेना भाजप युतीसह मनसे राष्ट्रवादीचे उमेदवारही रिंगणात आहेत. मात्र मुख्य लढत ही काँग्रेस आणि शिवसेनेमध्येच असणार आहे. नगराध्यक्षासाठी काँग्रेसतर्फे स्नेहल जगताप, शिवसेना-भाजप युतीच्या भाग्यश्री म्हामुणकर, मनसेच्या प्रतीक्षा कु लकर्णी यांच्या तिरंगी लढत होणार आहे.


मुरुड नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत
आगरदांडा/ मुरु ड : मुरुड नगरपरिषद सार्वत्रिकनिवडणूक २०१६ या निवडणुकीसाठी प्रभाग ८ मधून १७ जागांसाठी नगरसेवकसाठी ५८, तर ४ नगराध्यक्षा नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. गुरु वारी त्यामधील दोन अपक्ष तर एक भाजपा पक्षामधून उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले होते. त्यानंतर निवडणुकीकरिता ५५ नगरसेवकांसाठी अर्ज दाखल आहेत, तर ४ नगराध्यक्षासाठी अर्ज दाखल आहेत. मुरुड -जंजिरा नगराध्यक्षासाठी चौरंगी लढत होणार आहे. १०,२०२ मतदाते मतदान करणार असून लोक त्यांच्या पसंतीने थेट नगराध्यक्ष निवडणार आहेत. शुक्रवारी शेवटच्या दिवशी सकाळी मुरुड नगरपरिषदेच्या नानासाहेब धर्माधिकारी या सभागृहात ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी अपूर्वा वानखेडे यांच्याकडे अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक ७ ब सर्वसाधारण यामधून अपक्ष उमेदवार महेंद्र गार्डी, जगदीश सरपाटील, भाजपाकडून संजय भायदे या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे नगरपरिषदेसाठी आता ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेकडून स्नेहा पाटील, अपक्ष खौला अब्दुल रहिम कबले, महाआघाडी मुग्धा मंगेश दांडेकर, भाजपा प्रीती प्रवीण बैकर यामध्ये चौरंगी लढत आता निश्चित झाली आहे. सदरच्या या संपन्न होणाऱ्या निवडणुकीत १७ पैकी ९ महिला नगरसेविका होणार आहेत. त्यातच भर म्हणून नगराध्यक्ष ही महिला होणार आहे.


माथेरानमध्ये ४६ उमेदवार रिंगणात
माथेरान : माथेरानच्या सार्वत्रिक निवडणुकीत चौरंगी लढत होत असल्याने सर्वांचे या आगामी निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी ३ वाजता अपक्ष असणारे प्रभाग क्र . ‘८ ब’च्या सर्वसाधारण महिला वर्गासाठी नामांकन सादर केलेल्या मंदाकिनी तुपे आणि प्रभाग ‘८ क’च्या सर्वसाधारण महिला वर्गासाठी नामांकन सादर केलेल्या विदुला खेडकर यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. त्यामुळे आता एकूण ४६ उमेदवारांमध्ये एक अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ४६ उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्ष ११, कॉँग्रेस ०७, शिवसेना १७, राष्ट्रवादी कॉँग्रेस १० उमेदवार असून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि अपक्ष अशा चार जागी नगराध्यक्षपदांसाठी महिला उमेदवार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आता निवडणुकीला खरी रंगत चढणार आहे.

Web Title: Three days extension for withdrawal of application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.