तीन मजली इमारत कोसळली, तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 04:46 PM2018-08-01T16:46:05+5:302018-08-01T18:51:35+5:30
दारावे गाव येथील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
नवी मुंबई : दारावे येथील धोकादायक इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर कोसळल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. यामध्ये तळमजल्यावरील एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न गेली तीन वर्षे रखडला असल्याने दुसऱ्या मजल्यावरील घरात राहण्यायोग्य डागडुजी सुरु असताना हा प्रकार घडला.
दारावे सेक्टर २३ येथील स्वप्न साकार इमारतीमध्ये हि दुर्घटना घडली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या ए विंग च्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला. त्यांनतर पहिल्या मजल्याचाही स्लॅब तळमजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत तळमजल्यावरील घरात राहणारे सुमिता चव्हाण अनुसया चव्हाण तसेच प्रीतम चव्हाण हे जखमी झाले आहेत. त्यांना वेरूळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्याच कुटुंबातील अरुणा चव्हाण ह्या नोकरीवर गेलेल्या असल्याने त्या बचावल्या आहेत.
अनुक्रमे दुसऱ्या व पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने झालेल्या आवाजामुळे इमारतीच्या बी बिंग मधील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठवून घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार वाशी व नेरुळ अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी खबरदारी म्हणून संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
सदर इमारत १९९७ साली बांधलेली असून मागील अनेक वर्षांपासून ती धोकादायक स्थितीमध्ये आहे. यामुळे सोसायटीने इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न चालवला होता. परंतु तीन वर्षांपासून त्यांच्या इमारतीच्या पुनर्बांधणीला हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे इमारतीची तसेच घरांची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून रहिवाशी जीव मुठीत धरून त्याठिकाणी राहत आहेत. अखेर बुधवारी दुपारी ए विंगच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात डागडुजी सुरु असताना दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून इमारतीमधील रहिवाशांची बेलापूरच्या रात्रनिवार केंद्रात सोय केली आहे.