‘मुस्कान’अंतर्गत तीन मुलींची सुटका; गुन्हे शाखेचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:44 AM2018-12-09T00:44:34+5:302018-12-09T00:44:50+5:30
अल्पवयीन बेपत्ता मुलांचा शोध घेण्याच्या उद्देशाने राबवलेल्या ‘मुस्कान’ ऑपरेशन अंतर्गत तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला आहे.
नवी मुंबई : अल्पवयीन बेपत्ता मुलांचा शोध घेण्याच्या उद्देशाने राबवलेल्या ‘मुस्कान’ ऑपरेशन अंतर्गत तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने राज्याच्या विविध भागांतून त्यांचा शोध घेऊन त्यांना पळवून नेणाऱ्यांना अटक केली आहे.
अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण गंभीर असल्याने त्यांच्या शोधासाठी आॅपरेशन ‘मुस्कान’ राबवले जाते. त्यानुसार बेपत्ता असलेल्या व अद्याप शोध न लागलेल्या बालकांचा गुन्हे शाखेमार्फत शोध घेतला जातो, याकरिता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, ज्योती सूर्यवंशी व इतर कर्मचाºयांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी ‘मुस्कान’ मोहिमेच्या कालावधीत नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी तीन मुलींची सुटका केली आहे. खारघर, नेरुळ व रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. खारघर येथून तीन वर्षांपूर्वी सहा वर्षांची मुलगी बेपत्ता होती; परंतु शोध घेऊनही तिच्याविषयी माहिती मिळू शकलेली नव्हती.
या दरम्यान, दोन वर्षांपासून तिचे कुटुंबीयही तळेगावला स्थलांतरीत झाले होते. मात्र, ‘मुस्कान’ आॅपरेशनदरम्यान करावे येथून तिचा शोध लागला आहे. तर नेरुळ येथून दीड महिन्यांपूर्वी बेपत्ता असलेली १६ वर्षांची मुलगी कर्नाटकातील गुलबर्गा परिसरात सापडली आहे.
रबाळे एमआयडीसी येथील गुन्ह्यात १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले होते, यानुसार सोलापूरपर्यंत पोलिसांनी तिला पळवून नेणाºया शिक्षकाचा पाठलाग करून मुलीची सुटका केली. तसेच सदर शिक्षकालाही अटक केली.