नवी मुंबई : महापालिकेचे दोन अभियंते व एका स्वच्छता अधिकाऱ्यावर आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेवून ही कारवाई केली असून त्यामुळे कामचुकारपणा करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.कारवाई केलेल्यांमध्ये कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे, ठोक मानधनावरील सूचित पारवे व स्वच्छता निरीक्षक अरुण पाटील यांचा समावेश आहे. मनोहर सोनावणे यांच्यावर हैदराबादमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्या प्रशिक्षणासाठी जाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. संबंधित ठिकाणी जाऊन महापालिकेने केलेल्या कामाविषयी माहिती द्यायची होती; परंतु ते त्या प्रशिक्षणासाठी गेले नाहीत. यामुळे त्यांना निलंबित केले आहे. ठोक मानधनावरील कनिष्ठ अभियंता सूचित पारवे यांच्यावर सायन-पनवेल महामार्गावरील नेरुळ एलपी येथील प्रसाधनगृह बांधणीच्या कामाची जबाबदारी देण्यात आली होती. ठेकेदाराकडून योग्यपद्धतीने काम करून घेतले नाही. कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांची सेवा खंडित केली आहे.महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नुकताच नेरुळ विभागाचा पाहणी दौरा केला होता. या दौºयाच्या वेळी अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळून आली. स्वच्छता निरीक्षक अरुण पाटील यांचे त्यांच्या कामावर व्यवस्थित लक्ष नसल्याचे या वेळी निदर्शनास आल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.आयुक्तांच्या या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी निष्काळजीपणा करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेच या कारवाईद्वारे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेचे तीन अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:22 PM