- कमलाकर कांबळे नवी मुंबई : सिडकोच्या कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार शहर सेवा विभागात महत्त्वपूर्ण खांदेपालट करण्यात आली आहे. तसेच सिडकोच्या सेवेत नव्याने दाखल झालेले अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे यांच्यावर नवीन शहर विकास प्राधिकरण (डीटीडीए भूसंपादन) विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सिडकोत नव्याने बदली होऊन आलेले दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी गुट्टे यांना या कामात मदत करणार आहेत.कोकण विभाग पुरवठा विभागाचे उपायुक्त दिलीप गुट्टे यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्याने शासनाने त्यांची सिडकोत बदली केली आहे. तसेच उपजिल्हाधिकारी असलेले एस. एस. सरवदे आणि अशोक मुंडे याची देखील सिडकोत बदली करण्यात आली आहे. नव्याने सिडकोच्या सेवेत आलेल्या महसूल विभागातील या अधिकाऱ्यांवर नवीन शहर विकास प्राधिकरण (डीटीडीए भूसंपादन) विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर शहर सेवा-२ ची जबाबदारी एस. एस. सरवदे तर फैय्याज खान यांच्याकडील शहर सेवा-३ ची जबाबदारी अशोक मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.नैना क्षेत्राचा विकास, आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची जबाबदारी सध्या सिडकोच्या खांद्यावर आहे. कोकणातून हद्दपार झालेला नाणार प्रकल्प रायगडमध्ये उभारण्याचे सूतोवाच राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारी जमीन संपादित करण्याची जबाबदारी सुद्धा सिडकोवर सोपविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार महत्त्वाच्या विभागात लक्षणीय बदल केले जात आहेत. महत्त्वाच्या विभागात सक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यामार्फत सुरू आहे.किसन जावळे निवडणूक ड्युटीवर?सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचा कार्यभार असलेले अप्पर जिल्हाधिकारी किसन जावळे यांना राज्य सरकारने निवडणूक ड्युटीवर पाठविल्याचे समजते.विशेष म्हणजे राज्य सरकारने गेल्या महिन्यात जावळे यांची मुख्य भूमी व भूमापन विभागातून अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक म्हणून बदली केली आहे. त्यानंतरही जावळे यांच्यावर मेहरनजर दाखवत सिडकोने त्यांच्याकडे भूमी व भूमापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवला आहे. अनधिकृत बांधकाम नियंत्रण आणि भूमी व भूमापन हे दोन्ही विभाग सिडकोच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु राज्य शासनाने जावळे यांना निवडणूक ड्युटीवर पाठविल्याने या काळात या दोन्ही विभागाचे कामकाज ठप्प पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवे शहर प्रकल्पासाठी तीन अधिकाऱ्यांची टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:32 PM