Navi Mumbai : ऐन दिवाळीत नवी मुंबई स्फोटाने हादरली आहे. एका दुकानात झालेल्या स्फोटात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवी मुंबईतील उलवे येथील जावळे गावात एका किराणा दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुकानाला आग लागली. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने अग्निशमन विभागाला याची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
नवी मुंबईतील उलवे येथे बुधवारी सायंकाळी तीन गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर एका किराणा दुकानाला आणि घराला लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेत दुकानदार रमेश जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झालाय. नवी मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, आम्हाला ३० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता एका व्यक्तीच्या किराणा दुकानाला आणि घरी आग लागल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किराणा दुकानात तीन गॅस सिलिंडर फुटल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे दुकान आणि घराला आग लागली. पाच किलोचे दोन आणि १२ किलोचा एक सिलेंडर फुटला. या घटनेत जखमी रमेशची पत्नी मंजू आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. तर रमेश जबर जखमी झाला आहे. रमेश हा राजस्थानचा रहिवासी होता. तो कुटुंबासह नवी मुंबईत राहत होता. जखमींवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनीही घटनेची माहिती सांगितले की, "आम्ही घटनास्थळी पोहोचून आग विझवली आहे. जखमींना स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या २ गाड्यांच्या मदतीने आम्ही आग विझवली आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसते, मात्र त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही."