पोलादपूर : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील लेप्रेसि हॉस्पिटलसमोरून वाहणाऱ्या सावित्री नदी पात्रामध्ये एक व्यक्ती अडकल्याने त्याला वाचविण्यासाठी दोन तरुण गेले; मात्र तेही अडकले. त्यांना वाचविण्यासाठी म्हसळा येथे एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आदिवासी तरुण नदीपात्रात उतरला होता. मात्र, पाण्याच्या प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने तो वाहू लागला असता त्याला वाचविण्यासाठी इतर दोन सहकारी नदी पात्रात उतरले; मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत ते वाहू लागले. त्यांना वाचविण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीवर ना होडी आहे ना कोणतेही यंत्रणा. अखेर म्हसळा येथे कार्यरत असलेल्या एनडीआरएफच्या टीमला बोलाविण्यात आले. मात्र, म्हसळा येथून येण्यास एका तासाचा अवधी लागण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने आपत्ती निवारण कक्षामार्फत यंत्रणा राबविणे गरजेचे बनले आहे.या घटनेची माहिती समजताच पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव व त्यांची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. नदीच्या पात्रात अडकलेली व्यक्ती जवळील आदिवासीवाडीमधील असल्याचे सांगण्यात आले.