घरांच्या बहाण्याने फसवणाऱ्या तिघांना अटक

By admin | Published: December 23, 2016 03:27 AM2016-12-23T03:27:59+5:302016-12-23T03:27:59+5:30

घर देण्याच्या बहाण्याने १३३ हून अधिकांची ५ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या विकासकासह दोघांना वाशी पोलिसांनी अटक

Three people who have been deceived by the housing scandal get arrested | घरांच्या बहाण्याने फसवणाऱ्या तिघांना अटक

घरांच्या बहाण्याने फसवणाऱ्या तिघांना अटक

Next

नवी मुंबई : घर देण्याच्या बहाण्याने १३३ हून अधिकांची ५ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या विकासकासह दोघांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या मागणीनुसार न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यापासून तो विकासक फरार होता. अखेर खारघरमध्ये सापळा रचून वाशी पोलिसांनी त्याला अटक केली.
शिरीषकुमार उर्फ राजू चव्हाण असे अटक केलेल्या खासगी विकासकाचे नाव आहे. त्याने कळंबोली येथील गृहप्रकल्पात घरांच्या बहाण्याने अनेकांकडून लाखो रुपये घेतले होते; परंतु मुदत होऊनही तो संबंधितांना घराचा ताबा देत नव्हता. शिवाय, एकच घर अनेकांना विकूनही त्याने काहींची फसवणूक केली होती. फसवणूक झालेल्या १३३ हून अधिक नागरिकांनी त्याच्याविरोधात वाशी पोलिसांकडे तक्रार केली होती. दरम्यान, त्याने गुंतवणूकदारांच्या रकमेची परतफेड करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु चव्हाणचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी वाशी पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती केली होती. त्याआधारे नोव्हेंबर महिन्यात न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला; परंतु जामीन रद्द होताच, चव्हाण हा सतत राहण्याचे ठिकाण बदलून पोलिसांची कारवाई टाळत होता. अखेर तो खारघरमध्ये येणार असल्याची खात्रिशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चेतन काकडे, सहायक निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला होता. यामध्ये चव्हाण हा पोलिसांच्या हाती लागला. अटकेनंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे दोन मेहुणे संतोष तांबे व दीपक तांबे यांनाही कोल्हापूरमधून अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. चव्हाणविरोधात अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच यांचे ८ अजामीनपात्र वॉरंट निघालेले आहेत. त्यापैकी एका प्रकरणात त्याला तीन वर्षांची कैद व दहा हजार रुपयांचा दंडही झालेला आहे. शिवाय, पनवेल व कळंबोली पोलीस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे आहेत.

Web Title: Three people who have been deceived by the housing scandal get arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.