स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळीसाठी ९२ ठिकाणी ‘थ्री आर’ सेंटर; महापालिकेचे स्वच्छता अभियान
By कमलाकर कांबळे | Published: November 4, 2023 08:12 PM2023-11-04T20:12:16+5:302023-11-04T20:12:34+5:30
आयुक्तांनी केल्या महत्त्वाच्या सूचना
नवी मुंबई : स्वच्छतेत नवी मुंबई शहराचा नावलौकिक अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित विभागाला शनिवारी दिले.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकारच्या सहसचिव तथा स्वच्छ भारत मिशनच्या संचालक रूपा मिश्रा यांनी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या वेबसंवादामध्ये ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ ही नवी मोहीम राबविण्याचे निर्देश दिल्याने त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. यासाठी दिवाळीपूर्वी आपल्या घराची साफसफाई करताना नको असलेल्या वस्तू टाकण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ९२ ठिकाणी ‘थ्री आर’ सेंटर उभारले आहेत.
‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ ही मोहीम राबविताना स्वच्छतेमधील अत्यंत महत्त्वाचा म्हणजे स्वच्छतेची प्रत्यक्ष कृती करणारा घटक अर्थात स्वच्छतामित्रांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना मास्क वितरित करण्याचे सूचित केले होते. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त नार्वेकर यांच्या हस्ते सफाईकर्मींना प्रातिनिधिक स्वरूपात मास्क वितरण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गडदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
लोकसहभागातून विविध उपक्रम
‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ या मोहीमअंतर्गत शासनामार्फत प्राप्त सूचनांनुसार महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात दिवाळी स्वाक्षरी मोहीम, प्लास्टिक प्रतिबंध व पर्यायी कापडी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती , इकोफ्रेंडली लोकल प्रॉडक्ट्सचा वापर आदींचा समावेश आहे. नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन ‘स्वच्छता हीच लक्ष्मी’ या आपल्या पारंपरिक शिकवणीनुसार शहर स्वच्छतेत योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त नार्वेकर यांनी केले आहे.