शिवसेनेला पडणार खिंडार; महापालिकेतील तीन नगरसेवक भाजपाच्या संपर्कात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:52 PM2020-03-11T23:52:28+5:302020-03-11T23:52:45+5:30

विकासकामांच्या उद्घाटन बॅनरवर नाईक परिवाराचे फोटो; राजकीय घडामोडींना वेग; तर्कवितर्कांना उधाण

Three Shiv Sena corporators in the Municipal Corporation contacted the BJP | शिवसेनेला पडणार खिंडार; महापालिकेतील तीन नगरसेवक भाजपाच्या संपर्कात 

शिवसेनेला पडणार खिंडार; महापालिकेतील तीन नगरसेवक भाजपाच्या संपर्कात 

Next

नवी मुंबई : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्येही खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. घणसोलीमधील प्रशांत पाटीलसह त्यांच्या परिवारातील तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी घणसोली सेंट्रल पार्क व इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी पाटील परिवाराने लावलेल्या बॅनरवर आमदार गणेश नाईक व भाजप नेत्यांचे फोटो झळकल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीची स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपच्या सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तुर्भे, सीवूड व शिवाजीनगरमधील चार नगरसेवक भाजप सोडून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपनेही शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. घणसोलीमधील शिवसेना नगरसेवक प्रशांत पाटील, कमलताई पाटील, सुवर्णा पाटील या भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी घणसोलीमधील सेंट्रल पार्कचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय सेक्टर सातमधील मैदानाचा व शाळेचा नामकरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठीचे पाटील कुटुंबीयांचे फोटो असलेले बॅनर समाजमाध्यमांमधून शहरभर प्रसारित होत आहेत.

या बॅनरवर आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक व महापौर जयवंत सुतार यांचे फोटो झळकत आहेत. यामुळे पाटील परिवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे. घणसोलीमधील सेंट्रल पार्कचे उद्घाटन व्हावे, उद्यान जनतेसाठी खुले व्हावे यासाठी प्रशांत पाटील यांनी महानगरपालिकेमध्ये नेहमी आग्रही भूमिका मांडली. परंतु त्यांना शिवसेनेची फारशी साथ लाभली नाही. शिवसेनेने सभागृहात कधीच हा विषय लावून धरला नाही. भाजपने हा विषय सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रशांत पाटील यांनी उद्घाटनाच्या बॅनरवर शिवसेनेऐवजी भाजप नेत्यांचे फोटो लावले आहेत.

गुरुवारी सेंट्रल पार्कच्या उद्घाटनानंतर प्रशांत पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. घणसोलीप्रमाणे कोपरखैरणेमधील दोन ज्येष्ठ नगरसेवकही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. भाजपने शिवसेनेमध्ये खिंडार पाडण्यास सुरुवात केल्याने लवकरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपचे काही नगरसेवक फोडणार असल्याचे बोलले जात आहे.

घणसोली परिसराच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. सेंट्रल पार्कचे लोकार्पण लवकर व्हावे यासाठीही पाठपुरावा केला होता. आमदार गणेश नाईक यांनी उद्यानाच्या लोकार्पणासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने उद्घाटनाच्या बॅनरवर त्यांचा फोटो टाकला आहे. पक्षांतराशी याचा संबंध नसून काही निर्णय घेतल्यास पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली जाईल. - प्रशांत पाटील, नगरसेवक

Web Title: Three Shiv Sena corporators in the Municipal Corporation contacted the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.