नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्येही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. घणसोलीमधील तीन नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला आहे.
घणसोली प्रभाग ३२ चे नगरसेवक प्रशांत पाटील, प्रभाग ३४ च्या कमलताई पाटील व प्रभाग ३६ च्या सुवर्णा पाटील यांनी आयुक्तांकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. या वेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीची स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपच्या सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तुर्भे, सीवूड व शिवाजीनगरमधील चार नगरसेवक भाजप सोडून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपनेही शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. घणसोलीमधील शिवसेना नगरसेवक प्रशांत पाटील, कमलताई पाटील, सुवर्णा पाटील या भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी घणसोलीमधील सेंट्रल पार्कचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय सेक्टर सातमधील मैदानाचा व शाळेचा नामकरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठीचे पाटील कुटुंबीयांचे फोटो असलेले बॅनर समाजमाध्यमांमधून शहरभर प्रसारित होत आहेत.