जेएनपीटीत कामगारांकडून सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:31 AM2020-04-26T00:31:48+5:302020-04-26T00:32:05+5:30
जगभरातील मालवाहू जहाजे बंदरात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असताना आता हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणांहून हे कामगार एकत्र येत नियमांचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उरण : लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सेवा देणाऱ्या जेएनपीटी बंदरातच शिफ्ट बदलताना कामगार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. जगभरातील मालवाहू जहाजे बंदरात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असताना आता हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणांहून हे कामगार एकत्र येत नियमांचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जेएनपीटी बंदरातील कामगारांच्या आततायी वर्तनामुळे कोरोनाचे संक्रमण पसरण्याची भीती कामगारांकडून व्यक्त केली जात आहे. देशावर आलेले कोरोनाचे महासंकट रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाºया जेएनपीटी बंदरातील संचारबंदी आदेशाचे काटेकोर पालन करून कामकाजाला सवलत दिली आहे. या वेळी नियम, अटी-शर्थी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आश्वासन जेएनपीटी प्रशासनाने दिले आहे. त्यानुसार बंदरातून कोरोनाचा कोणत्याही परिस्थितीत प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी राष्ट्रीय निकषाप्रमाणे जेएनपीटीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे सुरू केले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जेएनपीटी बंदरात कामगारच लॉकडाउनच्या नियमांना हरताळ फासत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. जेएनपीटी बंदरात तीन शिफ्टमध्ये काम चालते. या तीन शिफ्टचेंज दरम्यान कामगारांची अदलाबदल होत असते. अशा शिफ्टचेंज दरम्यान शुक्रवारी सोशल डिस्टन्सिंगचे पालनच होत नसल्याचे समोर आहे.
>हॉटस्पॉट क्षेत्रातील कामगार
शिफ्टचेंज दरम्यान कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणाहून कामगार येतात. जेएनपीटी बंदरातील कामगारांच्या गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण या ठिकाणाहून आणखीनच पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.