- वैभव गायकरपनवेल : पनवेलमध्ये गुरुवारी मनोज जरांगे यांच्या स्वागताची जय्यत तयारी मराठा बांधवांनी केली होती. कामोठे येथे पदयात्रींसाठी पाणी, नाश्त्याची तसेच जेवणाची पाकिटे तयार ठेवली. विशेष म्हणजे जरांगे पाटलांच्या स्वागताला मराठा बांधव मोठ्या संख्येने जमले होते. तीन हजार किलोचा मसालेभात आणि २५ हजार चपात्या घराघरांतून गोळा केल्या.
यावेळी ढोल-ताशावर मराठा बांधवांनी कामोठे येथे ठेका धरला. मुंबईकडे निघालेल्या मराठा मोर्चातील मोर्चेकऱ्यांना जेवण देण्यासाठी तीन दिवसांपासून कामोठ्यात लगबग सुरू होती. सायन-पनवेल महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चेकऱ्यांना कामोठ्यातील मराठा समाज जेवण देऊन पाहुणचार करणार आहेत.
४०० फिरत्या शौचालयांची सोयमोर्चेकऱ्यांच्या सोईसाठी पनवेल महापालिकेने पनवेल महापालिका क्षेत्रातील सायन-पनवेल महामार्गावर १०० तात्पुरती फिरती स्वच्छतागृहे ठेवली आहेत. तसेच ३०० स्वच्छतागृहे वाशी येथे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवली आहेत, अशी माहिती पनवेल महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.