अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : लॉकडाउनच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिसत आहे. त्याचबरोबर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये खासगी सुरक्षारक्षकांचाही खडा पहारा सुरू आहे. लॉकडाउनमुळे इतर सेवा बंद आहेत. परंतु आरोग्य विभाग तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयांत ३ हजारांपेक्षा जास्त सुरक्षारक्षक १२ तासांची सेवा देत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत आहे. पोलिसांची वाहने चौकाचौकात गस्त घालताना दिसत आहेत. या सर्वांत खासगी सुरक्षारक्षक काहीसे दुर्लक्षित झाले आहेत.रायगड जिल्ह्याचा विचार करता, ३१७८ सुरक्षारक्षक सध्या दिवसरात्र सेवा बजावत आहेत. शासनाच्या माध्यमातून रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ कार्यरत आहे. या मंडळांतर्गत १५३९ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. तर खासगी सुरक्षा सेवा पुरवणाऱ्या जवळपास २२ सिक्युरिटी एजन्सी आहेत. त्यांच्या अंतर्गत १६३९ खासगी सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. यात पनवेल महापालिका क्षेत्रात मंडळाचे ७०० सुरक्षारक्षक काम करतात. तर ९०० खासगी सुरक्षारक्षक काम करतात. सुरक्षारक्षक मंडळाच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्ह्ज दिल्याचे बोर्डाचे अधिकारी एम.एच. पवार यांनी सांगितले.।सुरक्षारक्षकांची विनातक्रार सेवादररोज किमान १२ तासांची ड्युटी करणाºया सुरक्षारक्षकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. तुटपुंजा पगार तोही वेळेवर होत नाही. तर सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य मिळत नाही.स्वत:चे घर नाही. ड्युटीच्या ठिकाणापासून कामाचे ठिकाण बरेच लांब आहे. अनेकाकडे चांगल्या दुचाकी नाहीत.गणवेश, ओळखपत्र आणि दंडुका याशिवाय रक्षणासाठी दुसरे साधन नाही, अशी अनेक कारणे आहेत. तरीसुद्धा या लॉकडाउन काळात सुरक्षा- रक्षक अविरत सेवा बजावत आहेत.
तीन हजार सुरक्षारक्षकांचा पहारा, शासकीय आणि निमशासकीय विभागात कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 1:32 AM