नवी मुंबई : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घालूनही शहरात काही दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्लास्टिकबंदी विशेष पथकाने प्लास्टिक पिशव्यांचा साठा असलेल्या खैरणे-बोनकोडे येथील एका गोदामावर सलग आठ दिवस पाळत ठेवून रविवारी सायंकाळी छापा टाकला आणि सुमारे तीन टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून दहा हजार रुपयांची दंडात्मक वसुली केली.खैरणे नाका येथे सेक्टर १२, दुकान क्रमांक ३ येथे अंश इंटरप्रायजेस हे जेवणावळीसाठी आणि इतर कार्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक वस्तू होलसेल आणि रिटेलर दुकान आणि गोदाम आहे. गोदामात प्लास्टिक पिशव्यांचा साठा सापडल्याने त्यांच्याकडून संपूर्ण साठा जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या विशेष पथकाने ३० दिवसांच्या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे व्यावसायिक, कचरा टाकून नागरिकांना उपद्रव करणारे दुकानदार यांच्यावर कारवाई करून एकूण १६ लाख रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली. हा प्लास्टिकचा साठा मुलुंड येथील जवाहर टॉकीज जवळील एका कंपनीमधून नवी मुंबईतील दुकानांमध्ये विक्रीला पाठविला जात असल्याची माहिती या पथकाकडून मिळाली.नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशानुसार घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या वेळी प्लास्टिकबंदी विशेष मोहिमेतील अधिकारी सोमेश्वर पाठक, राजेंद्र बाविस्कर, महेंद्र रुडे, मिलिंद तांडेल, मोनीश म्हात्रे आणि शंकर पाटील यांचा पथकात सहभाग होता.
खैरणेमधून तीन टन प्लास्टिक पिशव्या जप्त, महापालिकेकडून महिनाभरात १६ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 4:56 AM