कोकण रेल्वेच्या तीन गाड्या आता दादरपर्यंत
By कमलाकर कांबळे | Published: June 9, 2024 09:35 PM2024-06-09T21:35:46+5:302024-06-09T21:35:46+5:30
मध्य रेल्वेच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटी स्थानकातील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ७ जुलैपर्यंत कोकण रेल्वेच्या तीन गाड्यांचा प्रवास दादर स्थानकापर्यंतच सीमित राहणार आहे. मध्य रेल्वेच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १०, ११, १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात ७ जुलैपर्यंत बदल केला आहे. त्यानुसार या कालावधीत मंगलुरू जंक्शन - मुंबई सीएसएमटी (१२१३४) एक्स्प्रेसचा प्रवास दादर स्थानकात स्थगित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी (०२१२०) तेजस एक्स्प्रेस आणि मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी (१२०५२) या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवाससुद्धा ७ जुलैपर्यंत दादर स्थानकात स्थगित केला जाणार असल्याचे काेकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.