लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : कामोठे वसाहतीकडून मुंबईकडे जाणाऱ्या पुलालगतच्या सर्व्हिस रोडचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. मॅग्रोजमुळे रस्त्याला वनविभागाकडून परवानगी मिळत नसल्याने, रहिवाशांना एक ते दीड कि.मी.चा वळसा घालावा लागत आहे. त्याचबरोबर विरुद्ध दिशेला जाण्याकरिता मनाई करण्यात येत असल्याने रहिवाशांना कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या पनवेल-सायन महामार्गावर वाहतूककोंडी होत असल्याने रुंदीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी हाती घेतले. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वानुसार हा महामार्ग दहापदरी करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून टोलवसुलीही करण्यात आली आहे. कामोठे वसाहतीलगतच्या सर्व्हिस रोडचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे कामोठेकरांना मुंबई बाजूकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाच्या प्रवेशावर जावे लागत आहे. त्याचबरोबर बसथांबाही पुलाच्या प्रवेशद्वारावर केला आहे. त्यामुळे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवास धोका संभवतो. येथे निवारा शेड नाही. पुलाजवळ दररोज लहान-मोठे अपघात घडतात. सर्व्हिस रोडचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही अशीच स्थिती राहण्याची शक्यता असून, स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे काम किती दिवसांत पूर्ण होईल, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदाराला माहिती नाही. अमोल शितोळे आणि सखाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकता सामाजिक संस्थेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही करण्यात आले होते. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. व्ही अलगुट यांनी उपोषणकर्त्यांची चर्चा केली होती. वनविभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्वरित काम सुरू करण्यात येईल, असे अलगुट यांनी आश्वासनही देण्यात आले होते; परंतु अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही हालचाली नाहीत.
तीन वर्षांपासून सर्व्हिस रोडचे काम अपूर्णच
By admin | Published: June 28, 2017 3:29 AM