नवी मुंबईत फुटबॉलचा थरार, ९४ संघ १५०० खेळाडूंचा सहभाग; सलामीच्या सामन्यात ॲव्हालोन हाईट्स शाळेचा विजय
By नामदेव मोरे | Published: June 27, 2024 06:54 PM2024-06-27T18:54:35+5:302024-06-27T18:54:54+5:30
नवी मुंबईमध्ये फिफा १७ वर्षाखालील महिला फुटबॉलचे सामने व इतर अंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने झाल्यापासून फुटबॉलविषयी ची आवड वाढू लागली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये ९४ संघांनी सहभाग घेतला असून १५०० खेळाडूंचे कसब पणाला लागणार आहे. सलामीच्या सामन्यात वाशीतील ॲव्हालोन हाईट्स शाळेने सेंट मेरी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
नवी मुंबईमध्ये फिफा १७ वर्षाखालील महिला फुटबॉलचे सामने व इतर अंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने झाल्यापासून फुटबॉलविषयी ची आवड वाढू लागली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने नेरूळ सेक्टर १९ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल क्रीडांगण तयार केले आहे. वाशीमध्ये फादर ॲग्नेल संस्थेनेही अंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील अनेक शाळांनीही फुटबॉल संघ तयार करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व महानगरपालिकेच्यावतीने २८ जुनपासून जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू झाली आहे. नेरूळमधील महानगरपालिकेच्या मैदानात या स्पर्धेला शुभारंभ झाला. सलामीचा सामना ॲव्हालोन हाईट्स व सेंट मेरी यांच्यामध्ये झाला. ४ - २ अशा फरकाने ॲव्हालोन हाईट्स शाळेने हा सामाना जिंकला.
यावर्षी १५ वर्ष वयोगटात ३६ संघ सहभागी झाले आहेत. १७ वर्षाआतील मुलांचे ३६ व मुलींचे २२ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये एकूण ९४ संघांचा सहभाग असून १५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ऐन पावसाळ्यात या खेळाडूंचा विजेतेपदासाठी कस लागणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, क्रीडा उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, मनपा क्रीडा नियोजन समीतीचे सदस्य धनंजय वनमानी व इतर मान्यवर उपस्थित होते.