भर पावसात आंदोलन
By admin | Published: July 22, 2015 02:27 AM2015-07-22T02:27:28+5:302015-07-22T02:27:28+5:30
पनवेलमधील कोळवडी येथे भाड्याच्या इमारतीत सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सोयी-सुविधांअभावी काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना सोडावे
पनवेल : पनवेलमधील कोळवडी येथे भाड्याच्या इमारतीत सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सोयी-सुविधांअभावी काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना सोडावे लागले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी खांदा वसाहतीमधील शासकीय वसतिगृहात १५ दिवस तात्पुरता मुक्काम ठोकला होता. मात्र तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. याप्रकरणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा हे विधानसभेत दिशाभूल करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.
आमदार मनोहर भोईर यांनी कोळवडी येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करीत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना आदिवासी विकासमंत्र्यांनी संबंधित विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. ही माहिती खोटी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
गेल्या तीन महिन्यांपासून खांदा वसाहतीमधील शासकीय वसतिगृहात हे विद्यार्थी थांबले आहेत. जव्हार, वाडा, कर्जत, रायगड, रोहा, नेरळसह विविध भागांतील विद्यार्थी याठिकाणी राहतात. नवीन प्रवेशप्रक्रि या सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्यांना अडचणीमुळे प्रवेश घेता आलेले नाही. राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या गावामधून ये-जा करावी लागत आहे. हे खर्चिक देखील असल्यामुळे शिक्षणात अडचणी येत आहेत. वेळेवर प्रवेश न घेतल्याने महाविद्यालय नोटिसा पाठवत आहेत. त्यामुळे २०० विद्यार्थ्यांनी खांदा कॉलनीत निदर्शने केली. (प्रतिनिधी)