तीन महिन्यांनी हाती लागला ठग; पूजेच्या बहाण्याने महिलेला घातला होता गंडा
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 26, 2022 06:58 PM2022-09-26T18:58:56+5:302022-09-26T19:00:02+5:30
याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : स्वतःला सोनार भासवून पूजेच्या बहाण्याने भाजी विक्रेत्या महिलेला गंडा घालणारा तीन महिन्यांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. उलवे येथे तो गुन्हा करताना पकडला गेल्याने नागरिक त्याला चोपत असताना या महिलेने त्याला ओळखले. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शमशाद शेख (५२) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. जून मध्ये त्यांना एका व्यक्तीने फसवून ८० हजाराचे दागिने लंपास केले होते. शेख ह्या उलवे परिसरात हातगाडीवर भाजी विक्री करत असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आला होता. त्याने स्वतःला सोनार असल्याचे सांगून मंदिरात पूजेसाठी तात्पुरते सोन्याचे दागिने हवे असून ते पिशवीत ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर हातचलाखीने पिशवी बदलून त्याने दागिने घेऊन धूम ठोकली होती. रविवारी दुपारी शेख या उलवे परिसरात जात असताना काही नागरिक एका चोरट्याला पकडून मारत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता, त्यांना गंडवणारा देखील तोच असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत त्यांनी एनआरआय पोलिसांना कळवले असता त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल भाऊसाहेब सगलगीले असे त्याचे नाव असून तो पनवेलचा राहणारा आहे. गुन्ह्यासाठी त्याने वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असून त्यावर पोलीस लिहून तो परिसरात फिरत असे.