दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ
By admin | Published: November 10, 2015 01:22 AM2015-11-10T01:22:41+5:302015-11-10T01:22:41+5:30
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. रविवारी रात्री शहरात अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये दुकानांचाही समावेश आहे.
नवी मुंबई : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. रविवारी रात्री शहरात अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये दुकानांचाही समावेश आहे.
दिवाळीच्या आनंदात भर टाकण्यासाठी अनेक जण नव्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. अथवा काही जण सणाच्या दिवशी घालण्यासाठी लॉकर्समध्ये ठेवलेले दागिने घरी आणतात. शिवाय या काही दिवसात आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू असतानाच त्यांचे दिवाळे काढण्याची संधी चोरटे शोधत आहेत. त्यानुसार काही प्रमाणात त्यांना यशही मिळत आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरात अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. वाशीतल्या बिग स्प्लॅश इमारतीमधील ५ दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. दिवाळीच्या खरेदीसाठी सध्या प्रत्येक दुकानात ग्राहकांची झुंबड उडत आहे. यामुळे होणाऱ्या खरेदीच्या व्यवहारातून दुकानाचा गल्ला भरलेला असल्याचा विचार करूनच चोरट्यांनी त्याठिकाणी घरफोडी केली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याठिकाणी चोरट्यांच्या हाती जास्त काही लागले नाही. याचदरम्यान गोठीवली येथील गुरू माऊली या इमारतीमध्ये घरफोडी झाली आहे. तिथे राहणाऱ्या सचिनंद्र तिवारी यांच्या घरी ही घरफोडी झाली असून त्यामध्ये ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. गावठाण भागातील या इमारतीभोवती सुरक्षा भिंत नसल्याची व सुरक्षा रक्षक गाफील असल्याची संधी साधून अज्ञाताने तिथे घरफोडी केली. या चोरट्याने तिवारी यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरताना त्या दागिन्यांचे बिल देखील शोधून चोरून नेले आहेत. त्यामुळे चोरीचा हा ऐवज सोनाराकडे सहज विकला जाण्याची शक्यता आहे. घरफोडीची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे, वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत काटकर, निरीक्षक राजू अडागळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी चौकशीत दोन दिवसापूर्वीच त्याठिकाणी मोबाइल चोरीची देखील घटना घडल्याचे समोर आले. इमारतीमधील घरांच्या दरवाजाला बसवलेल्या कड्या हलक्या दर्जाच्या असल्याने चोरट्याने ती सहज तोडून त्याठिकाणी घरफोडी केली आहे.