अशाने नवी मुंबईची ठाणे, कल्याण-डोंबविलीसारखी बजबजपुरी होईल; अतिक्रमण, भूमाफियांना मिळणार बळ
By नारायण जाधव | Published: November 2, 2023 04:55 PM2023-11-02T16:55:56+5:302023-11-02T16:56:15+5:30
नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण आणि भूमाफियांचे मोठे पेव फुटले आहे.
नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबईत वाट्टेल तिथे अतिक्रमणे, वाट्टेल तशी अतिक्रमणे करून मोकळ्या जागा काबीज केल्या जात आहेत. भूमाफिया स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून सिडको, महापालिका, एमआयडीसीचे कोट्यवधी रुपये किमतीचे मोकळे भूखंड बळकावीत आहेत. मात्र, याकडे नवी मुंबई महापालिका, सिडकोने अक्षरश: हेतुपुस्सर दुर्लक्ष केले हाेते. मात्र, शहरातील ऑर्केस्ट्रा बार, हॉटेलांमधील वाढीव बांधकामे, तसेच ‘एमपीएमसी’तील व्यापाऱ्यांनी मन मानेल त्या पद्धतीने केलेली अतिक्रमणे हटविण्याची हिंमत नवे उपायुक्त राहुल गेठे यांनी सुरू केली. त्यांच्या कारवाईत मनमानी असेलही; परंतु अतिक्रमणे हटविल्यामुळे थेट सीएमओच्या आदेशानुसार तडकफडकी उचलबांगडी केल्याने अतिक्रमणधारक आणि भूमाफियांनी दिवाळी आधीच दिवाळी साजरी करणे सुरू केले आहे. सीएमओच्या अशा भूमिकेमुळे सुनियोजित नवी मुंबईतील अतिक्रमण माफियांना बळ मिळेल, असा सूर आता उमटू लागला आहे. ‘लोकमत’ने आपल्या मंडे स्पेशलमध्ये ‘अतिक्रमण पाडायचे की कारवाईचा फार्स करायचा’, अशी भीती व्यक्त केली होती. ती आता तंतोतंत खरी ठरली आहे.
नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण आणि भूमाफियांचे मोठे पेव फुटले आहे. बेलापूर करावे, नेरूळ, वाशीगाव, जुगाव, कोपरखैरणे-घणसोली, तळवली, गाेठीवली दिवसागणिक मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. खाडीकिनारी ही अवस्था शहरी भागात ऑर्केस्ट्रा, बार, पब, लाॅज, हॉटेल आणि दुकानमालकांनी मार्जिनल स्पेससह मोकळ्या जागेत अतिक्रमण केेले आहे. बांधकामाच्या मूळ आराखड्यात परवानगी न घेता अंतर्गत बदल करून वाढीव बांधकाम करून व्यावसायिक वापर करणे सुरू केले आहे. शीतगृहचालकांनीसुद्धा वेदरशेडच्या नावाखाली व्यावसायिक वापर सुरू केला आहे.
दुकानदार, हॉटेलमालकांनी नको तिथे पावसाळी शेड बांधून वापर सुरू केला आहे. आपल्या आस्थापनांचे नामफलकही मनमानीपणे परवानगी न घेता वाट्टेल तशा प्रकारे लावले आहेत. अशाच काही आस्थापनांवर उपायुक्त गेठे यांनी कारवाई सुरू केली होती. यामुळे हे घटक दुखावले गेले. त्यांच्याच तक्रारीनुसार शहरांतील अनधिकृत बांधकामांना मालमत्ता कर लावून अभय देणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी गेठेंविरोधात ‘ढोल’ पिटल्याने सीएमओने त्यांचा पदभार काढण्याचे आदेश दिल्याची चर्चा आयुक्तांनी तो काढण्याआधीच शहरांत सुरू झाली होती. यामुळे सीएमओवर या माफियांचा प्रभाव किती आहे, हे लक्षात येते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा पदभार काढला गेला.
गेठे यांनी जी कारवाई केली ती सदोषही असेलही कदाचित; परंतु त्यासाठी त्यांना दोन खडेबोल सुनावून सुधारणा करण्यास सांगण्याऐवजी थेट त्यांचा पदभार काढल्याने नवी मुंबईतील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माफियांना एकप्रकारे बळ मिळाले आहे. अशाने येणारा नवा अधिकारी शहरांतील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे काढण्याऐवजी त्या विभागातील राडे‘रोडे’ गोळा करणाऱ्यांकरवी आपली दुकानदारी सुरू करण्याची भीती आहे. नगरविकासचे असेच धोरण असेल तर सुनियोजित नवी मुंबईची ठाणे, कल्याण-डोंबविली, उल्हासनगर, भिवंडी या ठाणे जिल्ह्यातील शहरांसारखी बजबजपुरी होण्यास वेळ लागणार नाही.