शहरात ५० हजार मुलांना टायफॉइडची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:23 AM2018-07-24T03:23:43+5:302018-07-24T03:24:05+5:30
शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद; महापौरांसह आयुक्तांकडून केंद्रांची पाहणी
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने १४ जुलै ते २५ आॅगस्ट दरम्यान महानगरपालिका क्षेत्रात टायफॉइड कंज्युगेट लसीकरण अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत ४९,११२ मुलांना लस देण्यात आली असून आयुक्तांसह महापौरांनी शहरातील केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी रविवारी सिटी हॉस्पिटल, कोपरखैरणे येथे लसीकरण बुथला भेट देऊन बुथ मांडणी, साहित्य मांडणी, सिरिंजचा साठा, लसीची शीतसाखळी या सर्व बाबींची बारकाईने तपासणी केली, तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांचीही मते जाणून घेत मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, रवींद्र पाटील तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते. अभियानाच्या प्रारंभी १४ जुलै रोजी महापौर जयवंत सुतार यांनीही शिरवणे नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरण बुथला भेट देऊन पाहणी केली होती. १४ व १५ जुलै या दोन दिवसात नऊ महिने ते १५ वर्र्षांआतील २0 हजार ८३८ मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला होता. आता २१, २२ व २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तीन दिवसात २८ हजार २७४ मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून अशाप्रकारे एकूण ४९ हजार ११२ लाभार्र्थींनी नेरु ळ से.४८, नेरु ळ फेज १, शिरवणे, तुर्भे, इंदिरानगर, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, चिंचपाडा, दिघा अशा ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
टायफॉइड कंज्युगेट लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून पूर्वपात्रता आहे व जागतिक आरोग्य संघटनेने या लसीची शिफारस केली आहे. आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध हाच उपचार हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ९ महिने ते १५ वर्षांआतील मुलांना ही लस मोफत दिली जात असून यापुढील लसीकरण २८ जुलै रोजी होणार आहे हे लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यातील ११ नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, आपल्या मुलांना टायफॉइडपासून संरक्षित करावे, असे आवाहन महापौर जयवंत सुतार व आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.