पनवेल : जनरल तिकिटावर एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या दोघा प्रवाशांना तिकीट तपासनिसाने हटकल्याने या प्रवाशांनी तिकीट तपासनिसाला बेदम मारहाण केल्याची घटना दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी या दोघांवर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात मारहाण झालेले तिकीट तपासनीस पी. जी. सावंत यांना चिपळूण येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी अनू कोटीयान (३०) आणि उमेश आंबरे (२८) अशी या दोघांची नावे असून हे दोघेही ठाण्यातील कळवा भागात राहणारे असून, ते सकाळी दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसने गोवा येथे जात होते. या दोघांकडे जनरल डब्याचे तिकीट असतानाही ते रिझर्वेशनच्या डब्यामध्ये ठाणे येथून सदर एक्स्प्रेसमध्ये चढले. त्यानंतर दोघेही या डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत प्रवास करू लागले. ही एक्स्प्रेस सकाळी ६च्या सुमारास ठाण्यावरून सुटल्यानंतर तिकीट तपासनीस पी. जी. सावंत यांनी या दोघांकडे तिकिटाची मागणी केली. या वेळी त्यांच्याकडे जनरल तिकीट असल्याचे आढळून आले. त्यामुळे सावंत यांनी दोघांना त्यावरून सुनावून दुसऱ्या डब्यात जाण्यास सांगितले. यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान भांडणात झाले. त्यानंतर आरोपी अनू कोटीयान आणि उमेश आंबरे या दोघांनी तिकीट तपासनीस सावंत यांना हाता-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर तिकीट तपासनीस सावंत यांनी सदर ट्रेनमधील इतर प्रवाशांच्या मदतीने दोघांना पकडून पनवेल रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. (वार्ताहर)
तिकीट तपासनिसाला बेदम मारहाण
By admin | Published: April 13, 2017 2:55 AM