- वैभव गायकरपनवेल : सहा महिन्यांपासून जास्त काळ लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व्यवसाय गेले. याचा फटका रंगभूमीवरील बॅकस्टेज कलाकारांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. रंगभूमीवर काम करणारे लाइटमॅन, नेपथ्यकार, सेट बदलविणारे कलाकार आदींसह विविध बॅकस्टेज कलाकार रंगभूमीवरील नाटक चांगले व्हावे, याकरिता मेहनत घेत असतात. नेहमी दुर्लक्षित राहिलेले घटक आजच्या घडीला आर्थिक विवंचनेत सापडले असून, भेटेल ते काम करण्याची तयारी या कलाकारांनी केली असून, अनेकांनी रिक्षा चालविण्यापासून, फटाके विक्री, भाजीविक्री, कंदील रांगोळी विक्री अशी कामेही सुरू केली आहेत.
पनवेलमध्ये वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विविध नाटकांचे प्रयोग चालत असतात. दोन दिवसांपूर्वी शासनाने रंगभूमीवरील कार्यक्रमांना परवानगी दिली असली, तरी अटी-शर्तींमुळे नाटक निर्माते हे सध्याच्या घडीला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढे धजावत नसल्याने, रंगभूमीवरील बॅकस्टेजचे काम करणारे कलाकार अद्यापही संकटात आहेत. सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी नाट्यगृहाच्या अर्ध्या क्षमतेनेच प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार आहे.