वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कामगार गावी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे पनवेल पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात घरे आणि खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. विशेषतः ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील अनेक व्यक्तींनी गुंतवणूक म्हणून खारघरसारख्या मोठ्या शहरात घरे घेऊन ठेवली आहेत. चार लाखांहून अधिक लोकवस्ती असलेल्या खारघर शहर आणि गावात अंदाजे पन्नास हजारांहून अधिक भाडेकरू वास्तव्यास आहेत. तर परिसरातील खारघर, कोपरा, बेलपाडा, मुर्बी, पेठ, ओवे आदी गावांतील प्रकल्पग्रस्तांचा रोजगार गेल्यामुळे खोली भाड्याने देऊन उदरनिर्वाह करीत आहेत. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्यामुळे कामगार गावी स्थलांतरित झाले. त्यामुळे खारघर परिसरात खोल्या रिकाम्या आहेत.
रिकाम्या घरांची देखभाल आणि वीजबिल घरमालकाला येत असल्यामुळे घरमालक, इस्टेट एजंट तसेच ओळखीच्या व्यक्तीकडे हजार, दोन हजार रुपये भाडे कमी असेल तरी चालेल, मात्र भाडेकरू शोधून घर भाड्याने द्यावे, अशी मागणी करीत आहेत. खारघर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता. दरवर्षी पाच हजारांहून अधिक भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात होते. अनेक भाडेकरू भाडेकराराची मुदत संपल्यावर परस्पर मुदत वाढवून घेतात. मात्र गेल्या सहा महिन्यांत खूप कमी भाडेकरार केल्याचे दिसून येते.
खारघर परिसरातील गावात ग्रामस्थाने बांधकाम केलेल्या खोलीमध्ये घरकाम, मजूर, रंगकाम, सुतार, गवंडी तसेच छोट्यामोठ्या पगारावर काम करणारे भाडेकरू राहत असत. मागील मार्च महिन्यापासून रोजगार गेल्यामुळे अनेक ग्रामस्थांनी भाडेकरूंचे घरभाडे माफ केले. अजूनही काम सुरू झाले नाही. त्यामुळे स्थलांतर झालेले कामगार फिरकले नाहीत. - अभिमन्यू तोडेकर, ग्रामस्थ