आरोग्य विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: April 11, 2017 02:17 AM2017-04-11T02:17:21+5:302017-04-11T02:17:21+5:30
सिडकोने नेमणूक केलेल्या व गेल्या १0 वर्षांपासून सिडको हद्दीत हिवताप सर्वेक्षण करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जानेवारी २०१७ पासून सर्वेक्षणाचे
- मयूर तांबडे, पनवेल
सिडकोने नेमणूक केलेल्या व गेल्या १0 वर्षांपासून सिडको हद्दीत हिवताप सर्वेक्षण करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जानेवारी २०१७ पासून सर्वेक्षणाचे काम न मिळाल्यामुळे २४ कामगार कामाच्या शोधात आहेत.
सिडको विकसित करत असलेल्या भागात नवीन पनवेल, कामोठे, तळोजा, खारघर, कळंबोली, काळुंद्रे, नावडे या भागात हिवताप सर्वेक्षणासाठी तात्पुरते मनुष्यबळ आरोग्य सेवा पुणे यांच्याकडून मंजूर करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांचे वेतन सिडकोमार्फत अदा करण्यात येत होते. यासाठी २४ क्षेत्रीय कर्मचारी हे काम करत होते. मात्र सद्यस्थितीत वसाहती पनवेल महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने सर्वेक्षणाची जबाबदारी आमची नसल्याचे सिडकोने जिल्हा हिवताप कार्यालयाला कळविले आहे. त्यामुळे या २४ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित राहावे लागले आहे. सिडको हद्दीत हिवताप सर्वेक्षण करण्याचे काम जानेवारी २०१७ पासून बंद आहे. त्यामुळे गेली १५ ते २० वर्षे सिडको हद्दीत घरोघरी जाऊन हिवताप सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या २४ कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१७ पासून घरीच बसावे लागले आहे.
पनवेलची वाढती लोकसंख्या लक्षात घेता हिवताप व डेंग्यू यासारखे आजार बळावल्याचे चित्र असून यावर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. मात्र सिडकोमार्फत पर्यायी व्यवस्था न करताच सर्वेक्षणाचे काम बंद करण्यात आले आहे. सिडकोकडून सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. या संदर्भात जिल्हा हिवताप कार्यालयातून पनवेल महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. पनवेल महापालिकेमार्फत सर्वेक्षणासाठी आरोग्य सेवक अथवा इतर पदांच्या तात्पुरत्या अथवा कायमस्वरूपी जागा भरताना २४ कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेऊन प्राधान्याने विचार करण्यात यावा, असे देखील जिल्हा हिवताप कार्यालयाकडून आयुक्तांना पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.
२४ क्षेत्रीय कर्मचारी ज्या भागात काम करत होते तो भाग महापालिकेच्या हद्दीत आहे. त्यानुसार सिडकोने पत्र दिले असून आम्ही कामगारांना वेतन देणार नाही, असे नमूद केले आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पनवेलच्या आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात काम असेल तर या क्षेत्रीय कामगारांचा विचार करावा किंवा आस्थापनावर घ्यावे.
- वैशाली पाटील,
जिल्हा हिवताप अधिकारी
आरोग्य विभागातील २४ कंत्राटी कामगारांची फाईल पाहावी लागेल. त्यांचे म्हणणे, मागण्या काय आहेत, तेही पाहावे लागेल.
- राजेंद्र निंबाळकर,
आयुक्त, पनवेल महानगरपालिका
जानेवारी महिन्यापासून कामावर नसल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता खायचे काय, असा प्रश्न सतावत आहे. आम्हाला कामावर घेण्याची आमची मागणी आहे.
- जगदीश पाटील, कर्मचारी