लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जानेवारीच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या सणानिमित्त नवदाम्पत्याला हलव्याचे दागिने घातले जातात. सुनेचे आणि लाडक्या जावयाचे कौतुक केले जाते. त्यांच्याप्रमाणेच नवजात बालकांनाही मकरसंक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालून, सजवून तयार करतात. यंदा यात भर पडली आहे ती मास्कची. काटेरी हलव्याने सजविलेले मास्क २०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत.
गुरुवारी मकरसंक्रांत आहे. त्यानिमित्ताने तिळगुळाबरोबर हलव्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवदाम्पत्यांसाठी हा सण खास असतो. या दिवशी नव्या जोडप्याचे कौतुक केले जाते. सासरी सून आणि जावयाचे लाड होतात. त्यांच्याप्रमाणेच नवजात बालकांनाही मकरसंक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालून, सजवून तयार करतात. त्यांचे लाड पुरवले जातात. बालकांना बोरन्हान घालण्याचीदेखील प्रथा आहे. हलव्यापासून मंगळसूत्र, नथ, चिंचपेटी, बांगड्या ते बाजूबंद, ठुशी, बिंदिया, मुकुट असे विविध दागिने बनविले जातात. महिला आणि पुरुष मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हे हलव्याचे दागिने घालतात. घरातील वरिष्ठ मंडळी या दिवशी नवदाम्पत्यांचे औक्षण करतात.
यंदा हलव्याने नटविलेल्या मास्कची भर पडलीआहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे अनिवार्य असल्याने संक्रांतीचे औचित्य साधून खास मास्क आले आहेत. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात, त्यानुसार मास्कही काळ्या रंगात तयार केले असून त्यावर सफेद रंगाच्या हलव्याने नक्षीकाम केले आहे. त्यामुळे ते अधिक खुलून दिसत आहे.