टाटा यार्डमधील माथाडींवर उपसामारीची वेळ, यार्ड भाड्याने दिल्याने कामच मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:24 AM2019-02-07T03:24:26+5:302019-02-07T03:24:37+5:30
कळंबोली येथील टाटा स्टील यार्ड हे दुसऱ्या दोन कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याने या ठिकाणी काम करणा-या ३७५ माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : येथील टाटा स्टील यार्ड हे दुसऱ्या दोन कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याने या ठिकाणी काम करणा-या ३७५ माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला कामच मिळत नसल्याने उदरनिर्वाह करायचा कसा? हा प्रश्न या कामगारांनी उपस्थित केला आहे.
लोह-पोलाद मार्केटच्या बाजूला टाटा स्टील कंपनीने २८ एकरांवर यार्ड तयार केले होते. सिडकोकडून लीजवर जागा घेऊन कंपनीने येथे स्टील यार्ड तयार केले होते. जमशेदपूर येथून वॅगने हा माल कळंबोलीतील यार्डमध्ये येत होता. येथून तो माल इतर ठिकाणी पाठवला जात असे. त्यामुळे येथे माथाडींना चांगला रोजगार मिळत असे. कळंबोलीत राहणारे ५०० पेक्षा जास्त जण येथे काम करीत होतो; परंतु २००१ मध्ये टाटा कंपनीने या ठिकाणची लोखंडाची ने-आण बंद केली आणि ही जागा आय. के. मरिन व गेट वे अॅन रेल्वे यांना संयुक्त भागीदारीत भाडेतत्त्वावर दिली. ते देत
असताना माथाडी कामगारांना जास्तीत जास्त काम ही कंपनी देईल
असे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात आमच्या पदरात काहीच पडले नसल्याचे बंडू धायगुडे यांनी सांगितले. त्या वेळी कामगारांनी आंदोलनसुद्धा केले, त्याची दखल घेत जमशेदपूर येथून कंपनीचे प्रतिनिधी येथे आले आणि त्यांची माथाडी बोर्डावर बैठक झाली. मात्र, दिलेल्या आश्वासनाची १८ वर्षांनंतरही पूर्तता झाली नसल्याची माहिती राम महानवर यांनी दिली.
ज्या कंपनीला ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे, ते येथे कंटनेर यार्ड तसेच इतर कामासाठी त्याचा वापर करीत आहेत. प्रत्यक्षात माल या यार्डात उतरत नाही त्यामुळे ३७५ कुटुबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रश्न कळंबोलीतील स्थानिक नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांनी गेल्या दोन वर्षांपासून हाती घेतला आहे.
जवळपास १८ वर्षांपासून आपल्या हातांना काम मिळेल या आशेवर माथाडी कामगार आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. टाटा आणि आय के मरिन या कंपनीची उच्चस्तरीय बैठक लावण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरूच ठेवणार आहे.
- मोनिका प्रकाश महानवर,
नगरसेविका, पनवेल महापालिका
आमच्या कंपनीलाही या ठिकाणी काम करायचे आहे. त्या दृष्टिकोनातून संचालक टाटा स्टील कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाली तर येथे मोठ्या प्रमाणात मालाची चढ-उतार होईल आणि माथाडी कामगारांना कामसुद्धा मिळेल.
- शत्रुघ्न देशमुख,
- पर्यवेक्षक, आय के मरिन