लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील रासायनिक कंपन्यांतून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्त सांडपाणी वाशी खाडीत सोडण्यासाठी एमआयडीसीने टाकलेली २७ वर्षांपूर्वीची जलवाहिनी जीर्ण झाल्याने खाडीत प्रदूषण पसरत आहे. यामुळे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सूचनेनुसार जलवाहिनी बदलण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. एमआयडीसीच्या या प्रस्तावास सीआरझेड प्राधिकरणाने आपल्या १८० व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. यामुळे वाशी खाडीतील प्रदूषण थांबण्यास मदत होणार आहे.
ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्याचे क्षेत्र २५६० हेक्टर असून, येथील रासायनिक कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीने पावणे येथे राष्ट्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सूचनेनुसार १९९८ साली ३.६ किमीची पाइपलाइन टाकली होती.
मात्र, आता ती जीर्ण झाल्याने लीकेज होऊन समुद्री वनस्पती आणि जलचरांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळेच ती नव्याने टाकण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यात बाधित होणाऱ्या ९८.१० मीटर क्षेत्रातील खारफुटीची कत्तल करावी लागणार असून, भरपाई म्हणून तिची इतरत्र लागवड करावी लागणार आहे.
मच्छीमार, जलचरांना मिळणार दिलासा
एमआयडीसीने ही नवी सांडपाणी वाहिनी टाकल्यानंतर सध्याच्या जुन्या वाहिनीतून होणाऱ्या लीकेजमुळे होणारे रसायनांचे प्रदूषण पूर्णपणे थांबणार आहे. यामुळे समुद्री पर्यावरणाचा ऱ्हास थांबून मासळी उत्पादन वाढून मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय खारफुटींसह इतर समुद्री वनस्पतींनाही लाभ होणार आहे. तसेच ठाणे-वाशी खाडीच्या परिसरातील रहिवाशांनाही मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
अशी असेल वाहिनी
- एकूण लांबी - ३.६ किमी
- पाण्याच्या पातळीपासूनच जलवाहिनीची खोली - ५.५ मीटर
- रुंदी - ६.४ मीटर