वैभव गायकरपनवेल : पनवेल शहरातील पाणीसमस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. शहरातील अनेक भागांत महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून तोही अपुरा असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत.दोन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईविरोधात शिवसेनेने महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात मोर्चा काढत जोरदार टीका केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने मोर्चा काढणारी सेनाच या विषयावर चिडीचूप असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.देहरंग धरणाने तळ गाठल्याने महापालिकेला इतर प्राधिकरणांच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या पनवेल शहराला सर्वात अपुऱ्या पाण्याचा फटका बसला आहे. सत्ताधारी भाजपविरोधात फेब्रुवारी महिन्यात हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत सत्ताधाऱ्यांवर गंभीर टीका करणारे सेनेचे पदाधिकारीही सध्या या विषयावर बोलण्याचे टाळत आहेत. या मोर्चात मावळचे विद्यमान खासदार व लोकसभेचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हेदेखील सहभागी झाले होते. काही दिवसांचा अल्टिमेटम देऊन सेनेने मोर्चा माघारी घेतला होता. मात्र, दोन महिन्यांत शहरातील पाण्याची समस्या सुटलेली नाही. मात्र, निवडणुकीचा मोहोल असल्याने सर्वपक्षीय नेते या प्रश्नांवर गप्प आहेत.पाणीप्रश्नावर आवाज उठवणारे सेनेचे पदाधिकारी भाजपशी युती झाल्याने प्रचाराकरिता एकत्र फिरत आहेत. सध्या शहराला २७ एमएलडी पाण्याची आवश्यकता असून, शहराची तहान केवळ ११ एमएलडी पाण्यावर भागवली जात आहे. खारघर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, शहरातील ग्रामीण भागातही हीच अवस्था आहे.महापालिकेतील विरोधी पक्षात असलेला शेकापही आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात गुंतला आहे. शहरातील पाणीसमस्येकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याचा फायदा परिसरातील टँकरमाफिया घेताना दिसतात. महापालिकेच्या टँकर धोरणाकडे दुर्लक्ष करीत मनमर्जीप्रमाणे वाटेल त्या किमतीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेने ठरविलेल्या टँकर धोरणानुसार, पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाºया टँकरवर पनवेल महानगरपालिकेचे नाव ठळकपणे लिहिलेले असावे. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. धोरणानुसार ठरवलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम नागरिकांकडून आकारली जात आहे.>शहरातील पाणीप्रश्नाचा खासदारांना विसरदेहरंग धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. हा गाळ काढल्यास धरणातील साठवणूक क्षमता वाढेल. रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असूनही गेल्या पाच वर्षांपासून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी एकदाही धरणाची पाहणी केलेली नाही. या संदर्भात विशेष पाठपुरावाही करण्यात आलेला नाही. महापालिकेत समस्यांची तक्र ार करण्यास गेल्यावर पालिका अधिकाºयांकडून इलेक्शन ड्युटी असल्याचे एकच उत्तर सध्या ऐकायला मिळत आहे.>आश्वासनांवर बोळवणपाणीपट्टी वेळेवर भरूनदेखील शहरात तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे.शहरातील समस्यांवर तोडगा निघत नसल्याने कफनगरमधील रहिवासी मतदानावर बहिष्काराच्या तयारीत असल्याची माहिती सिटिझन युनिटी फोरमचे सदस्य अरु ण भिसे यांनी दिली. कफनगरमध्ये एकूण ३२ सोसायट्या असून, ६०० पेक्षा जास्त लोकवस्ती आहे.
शहर तहानलेले, नेते प्रचारात व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:56 PM