दासगाव : महाड तालुक्यामध्ये अनेक कंपन्यांचे मोबाइल टॉवर आहेत. २०१६-१७मधील अनेक कंपन्यांकडून जवळपास १८ लाखांचा महसूल थकीत ठेवण्यात आला होता. या कंपन्यांच्या टॉवरना महाड महसूल विभागामार्फत सील ठोकणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ११ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे टॉवर कंपन्यांनी १८ मधून १४ लाखांचा महसूल महाड महसूल विभागात जमा केला. सध्या तालुक्यातील काही गावांमध्ये काही कंपन्यांचे टॉवर बंद आहेत. यामुळे ४ लाखांचा महसूल अद्याप थकीत असून, या कंपन्यावर काही दिवसांतच महाड महसूल विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली.२०१६-१७ वर्षाच्या कालावधीत महाड तालुक्यातील अनेक कंपन्यांनी १८ लाखांचा मोबाइल टॉवरचा महसूल थकवला होता. १७ टॉवरला सील ठोकण्याचे आदेश महाड महसूल विभागाकडून काढण्यात आले होते. या महसूल थकीत कंपन्यांमध्ये जी.टी.एल, टाटा, एअरटेल, रिलायन्स आणि युनिटी यांचा समावेश होता. गेल्या वर्षभरापासून महसूल खात्याकडून महसूल भरण्यासाठी नोटिसा देऊनही या कंपन्या पैसे भरण्यास टाळाटाळ करत होत्या. या महसूल थकीत संदर्भात ११ मार्चच्या ‘लोकमत’ वृत्तपत्रात ज्या कंपन्यांनी महसूल थकवला आहे, त्या कंपनीच्या टॉवरला सील ठोकण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर १८ लाखांमधून १४ लाखांचा महसूल महाड महसूल विभागात ताबडतोब भरला. यामध्ये आयडिया, टाटा, जीटीएल, इंडस, रिलायन्स, युनिटी या कंपन्यांचा समावेश आहे. वाळण, करंजाडी, भावे, दाभोळ, कोंझर, शिरगाव या गावांमध्ये टाटा आणि रिलायन्स कंपनीचे टॉवर असून, यांच्याकडून अद्याप चार लाखांची थकबाकी येणे आहे. त्या गावचे टॉवर बंद अवस्थेत असल्याने या कंपन्यांकडून महसूल भरण्यास नकार देण्यात येत आहे. मात्र, चार लाखांच्या वसुलीसाठी काही दिवसांतच या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महाडचे तहसीलदार महेंद्र बेलदार पाटील यांनी दिली. (वार्ताहर)
महाड महसूल खात्यात टॉवरची थकीत जमा
By admin | Published: April 01, 2017 6:18 AM