उरण : उरण तालुक्यातील जेएनपीटीच्या अखत्यारीतील ११ ग्रामपंचायतींना थकीत कर दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली.माजी खा.रामशेठ ठाकूर, सिडकोे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील ११ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांनी मुंबई येथे गडकरी यांची भेट घेऊन जेएनपीटीकडे थकीत असलेला कर मिळावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. या वेळी भाजपाचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, जासई विभागाचे अध्यक्ष तथा जासईचे उपसरपंच मेघनाथ म्हात्रे, सुनील घरत, महेश कडू, महादेव घरत, नीलेश घरत, निशांत घरत, मच्छींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.जेएनपीटी प्रकल्पग्रस्त जसखार, सोनारी, करळ, नवघर, पागोटे, फुंडे, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, जासई, चिर्ले, धुतूम या ग्रामपंचायतीची सुमारे २५८४ हेक्टर जमीन १९८४ साली संपादित झाली आहे. संबंधित ग्रामपंचायतीची काही कोटी रुपये मालमत्ता कराची रक्कम जेएनपीटीकडे थकीत आहे. आतापर्यंत जेएनपीटीने काही रक्कम ग्रामपंचायतींना भरली असून, काही रक्कम विविध कोर्टामध्ये भरली आहे. कोर्टामध्ये भरलेल्या रकमेपोटी राष्ट्रीय बँक गॅरंटी द्यावी लागल्यामुळे सदरची रक्कम बँकेमध्ये अडकून पडली आहे. तसेच २०१०-११ पासून आतापर्यंतची रक्कमसुद्धा जेएनपीटीने भरलेली नाही. याबाबत जेएनपीटीने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाकडे अपील केले असता ग्रामपंचायतींनी केलेल्या कराची मागणी योग्य असून ग्रामपंचायतींची थकीत कराची रक्कम ग्रामपंचायतीकडे भरावी, असा निकाल दिला आहे. याविरुद्ध जेएनपीटीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.
अकरा ग्रामपंचायतींना मिळणार थकीत कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:28 PM