श्रीमंत व्यापाऱ्यांची सुरक्षेसाठी कंजुसी
By admin | Published: November 16, 2015 02:22 AM2015-11-16T02:22:43+5:302015-11-16T02:22:43+5:30
मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. रोज करोडो रूपयांचे व्यवहार करणारे व्यापारी सुरक्षेवरील खर्चात मात्र कंजुसी करत आहेत.
नामदेव मोरे , नवी मुंबई
मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. रोज करोडो रूपयांचे व्यवहार करणारे व्यापारी सुरक्षेवरील खर्चात मात्र कंजुसी करत आहेत. मार्केटमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नाही. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून त्यामुळे आग व इतर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्यानंतर सर्वाधिक उलाढाल मसाला मार्केटमध्ये होते. श्रीमंतांचे मार्केट म्हणूनही ओळख आहे. परंतु दिवाळीदिवशी लागलेल्या आगीमुळे मार्केटमधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. ज्या गाळ्याला आग लागली तेथे बेकायदेशीरपणे बदाम फोडण्याचा कारखाना सुरू केला होता. यासाठी महापालिकेचा परवाना घेतलेला नव्हता. छतावरही मशीन बसविण्यात आल्या होत्या. आग लागलेला गाळाच नाही तर पूर्ण मार्केटमधीलच नाही, अनेक व्यापारी नियम धाब्यावर बसवत आहेत. ८० टक्के व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. गाळ्यावर दोन मजले तयार करून त्या जागेचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. माळ्यांवर जाण्यासाठी एक अरूंद शिडी ठेवण्यात आली आहे. सर्व ठिकाणी दाटीवाटीने माल ठेवण्यात येत असून आग किंवा इतर दुर्घटना झाली तर काम करणाऱ्यांना खाली उतरण्यासाठी जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांकडे प्रशासनही दुर्लक्ष करत आहे.
मसाला मार्केटमधील ई विंगमध्ये किराणा साहित्याची किरकोळ विक्री केली जाते. या व्यापाऱ्यांनी दोन्ही गाळ्यांच्या मध्ये असणाऱ्या जागेमध्ये साहित्य ठेवले आहे. यामुळे ये - जा करणाऱ्या नागरिकांना अडचण होत आहे. पूर्ण मार्केटमध्ये रोज करोडो रूपयांचे व्यवहार होत आहेत. परंतु व्यापाऱ्यांनी अग्निसुरक्षेसाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. गाळ्यांमध्ये फायर इस्टिंगविशरही नाही. मार्केटमध्ये ६६० गोडावून व मध्यवर्ती सुविधागृह इमारतीमध्ये २७३ गाळे आहेत. परंतु एकाही ठिकाणी आग लागल्यास ती तत्काळ विझविता येईल अशी काहीच यंत्रणा नाही. दुर्घटना घडली की व्यापारी बाजार समिती प्रशासनाला दोष देतात. प्रशासनावर दबाव आणून सर्व चुकांचे खापर त्यांच्या माथी मारले जाते. परंतु स्वत: मात्र सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना करत नाहीत. व्यापाऱ्यांच्या या उदासीनतेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई अग्निशमन दलाने यापूर्वीही एपीएमसीला अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आतापर्यंत पाठविलेल्या सर्व पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांवर व एपीएमसी प्रशासनावरही कारवाई करावी, अशी मागणी होवू लागली आहे.