लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई ( Marathi News ): श्री व्यंकटेश्वर (बालाजी) मंदिर उभारणीसाठी शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने उलवे येथे १० एकर जागा तिरुमला देवस्थान ट्रस्टला दिली आहे. आता याच नियोजित मंदिराच्या शेजारी श्री पद्मावती अम्मावरी मंदिराच्या उभारणीसाठी आणखी पाच एकर जागेची मागणी देवस्थानने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जागा देण्याचे धोरण नसल्याने यासंदर्भात शासनानेच निर्णय घ्यावा, अशी विनंती सिडकोने नगरविकास विभागाकडे केली आहे.
उलवे येथे सिडकोने बालाजी मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानला प्रतिचौरस मीटर एक रुपया दराने १० एकर क्षेत्रफळाचा भूखंड दिला आहे. हा भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असल्याने पर्यावरणप्रेमींनी हरित लवादाकडे तक्रार केली आहे.
वादात सापडला भूखंड
हा भूखंड वाटप वादात सापडले आहे. त्यातच आता तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) उलवे परिसरात नियोजित बालाजी मंदिराच्या लगतच पद्मावती देवीचे मंदिर बांधण्यासाठी अतिरिक्त पाच एकर क्षेत्रफळाचा भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे धार्मिक प्रयोजनासाठी २ हजार चौमी क्षेत्रफळापेक्षा अधिक आकारमानाचे भूखंड वाटपाचे सिडकोचे धोरण निश्चित नाही. त्यामुळे या प्रकरणी शासनाने लवकर निर्णय घेऊन आदेश द्यावा, अशाी विनंती सिडकोकडून नगरविकास विभागाला करण्यात आली आहे.