नवी मुंबई: वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच शहरातील वाढती लोकसंख्या आणि टीसीटी औद्योगिक क्षेत्रात ये-जा करणाऱ्यांची संख्याही गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. या वाढत्या लोकसंख्येत अनेकांना रस्ते ओलांडावे लागतात. यात अनेकदा अपघात घडतात. या वाढत्या अपघातांना आळा बसावा, यासाठी महापालिकेने तीन ठिकाणी नवे पादचारी पूल बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.
यातील एक पादचारी पूल महापालिका स्वखर्चाने बांधणार आहे, तर एक पूल एका मोठा उद्योगसमूह बांधणार असून, एका पुलाचे महापालिका रुंदीकरण करणार असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
कोपरीजवळील पूल ३.४५ कोटींचायातील पहिला पादचारी पूल कोपरी पूल ठाणे-बेलापूर रोडवर ज्या ठिकाणी उतरतो त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी पादचारी पूल नसल्याने अनेकजण महामार्ग ओलांडतात. यामुळे अपघात होतात, शिवाय सिग्नलही खोळंबतो. यामुळे येथील सिग्नल काढून पावणेचार कोटी रुपये खर्चून पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. यामुळे अपघातांना आळा बसून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
टाटा समूह बांधणार पादचारी पूलठाणे-बेलापूर मार्गावर रिलायन्सच्या लागूनच ४७ एकर भूखंडावर पाच हजार कोटी रुपये खर्चून टाटा समूहाच्या मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर तेथे ५० हजार रोजगार निर्माण होणार आहे. यामुळे येथे महामार्ग ओलांडणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. यामुळे ठाणे-बेलापूर मार्ग ओलांडण्यासाठी टाटा समूहाने स्वत:हून पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेस दिला आहे. यानुसार हा पूल टाटा समूह स्वखर्चाने बांधून तो महापालिकेकडे हस्तांतरित करणार आहे. मात्र, हा प्रस्ताव सध्या प्राथमिक पातळीवर असल्याचे संजय देसाई यांनी सांगितले.
वाशीतील पुलाची रुंदी वाढणारपामबीच मार्गावरून वाशी नोडमध्ये ये-जा करण्यासाठी महापालिकेने एक पादचारी पूल बांधला आहे. तो ओलांडण्यात विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, सध्या त्याची अवस्था जीर्ण झाल्याने जुना सांगाडा तोडून नवा आठ फूट रुंद पूल बांधण्यात येणार आहे. यामुळे पादचाऱ्यांसह तेथून सायकलही नेता येणार आहे. या कामावर ३२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.