नवी मुंबई: पारंपारिक शेतीला अधुनिक तंत्राची जोड देऊन उत्पादन क्षमता वाढविण्यावर राज्य सरकार भर देणार आहे. कृषीमालाला चांगला भाव व शेतीसाठी पायाभूत सुविधा पुरवून शेतकरी आत्महत्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यात नैसर्गिक शेतीसाठीही प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे मत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.
बाॅम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात पुरवठादार व खरेदी संस्थांची द्वैवार्षिक सभा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. "राज्यातील सरकार शेतऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यात कटीबद्ध आहे. राज्यात रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेती वाढविली जाईल. नैसर्गिक शेतीचे प्रमाण २५ हजार हेक्टर पर्यंत वाढविले जाईल. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल," असे ते यावेळी म्हणाले.राज्यात खाद्यतेल उत्पादनात वाढ केली जाईल. तेलघाणे वाढविले जातील असे मतही त्यांनी व्यक्त केले. नवी मुंबईत आयोजित दोन दिवसाच्या प्रदर्शनात राज्यातील शेतकरी संस्थांनी सहभाग घेतला आहे.
बाळासाहेबांचे नाव मिळाले याचा आनंद. आमची सेना हिच खरी शिवसेना आहे. आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले याचा आनंद आहे. कोण टिकणार हे निवडणुकीतून स्पष्ट होईल असे मतही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.