उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस; पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी २३ अर्ज दाखल
By कमलाकर कांबळे | Published: June 6, 2024 09:09 PM2024-06-06T21:09:34+5:302024-06-06T21:09:46+5:30
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विलास पोतनीस आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील या तिघांचा कालावधी ७ जुलै रोजी संपत आहे.
नवी मुंबई : विधान परिषदेच्या कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण २३ अर्ज दाखल झाले आहेत. यात कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ८, तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ६ अर्ज दाखल झाले आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आजच्या अखेरच्या दिवसात यात भर पडण्याची शक्यता आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विलास पोतनीस आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील या तिघांचा कालावधी ७ जुलै रोजी संपत आहे. त्यांच्या रिक्त होणाऱ्या तीन जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या या तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ जून दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उद्धवसेनेकडून ॲड. अनिल परब यांनी, तर शिंदेसेनेकडून डॉ. दीपक सावंत यांनी अर्ज भरले आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उद्धवसेनेने जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश किर यांच्यासह गोन्सालविस जेम्स मेट्स यांनी अर्ज दाखल केला आहे, तर काँग्रेसचे प्रकाश भांगरट यांनीसुद्धा गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १० ते १२ जूनपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे काँग्रेसचा नक्की उमेदवार कोण हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
निरंजन डावखरे आज भरणार अर्ज
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने तिसऱ्यांदा आमदार निरंजन वसंत डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार आज, शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता डावखरे आपला उमेदवारी दर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी डावखरे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.