नवी मुंबई : उल्लेखनीय नेतृत्व, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने विजय नाहटा फाउंडेशन पुरस्कृत ‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना या वेळी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवार, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यात ५० पेक्षा अधिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.शिक्षक हे भविष्यातील पिढी घडविण्याचे काम करत असतात. अशा शिक्षकांना ‘लोकमत’च्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे नवी मुंबईतील यंदाचे पहिलेच वर्ष आहे. शहरातील शाळांशी संपर्क साधून शाळेच्या कमिटीमार्फत सुचविलेल्या शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन ‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.या शिक्षकांना प्रशस्तिपत्रक तसेच सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विजय नाहटा फाउंडेशनचे संस्थापक विजय नाहटा, कार्याध्यक्ष विठ्ठल मोरे, दिल्ली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक जे. मोहंती, व्ही. टू. सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक राज जी. ठक्कर, रोनक अॅडर्व्हटायझिंगचे संचालक अमरदीप सिंग व्हिग, अभिनेता विजय पाटकर, अभिनेता जयवंत वाडकर व एस. के. बिल्डर्सचे संचालक डॉ. संजीव कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्र मासाठी प्रवेश मोफत असणार असल्याने नागरिकांनी या कार्यक्र माला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्काराची आज रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:39 AM