नवी मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत मेडिव्हिजन आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकल आणि डेंटलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय मेडिव्हिजन २०१७ या विद्यार्थी परिषदेचे आयोजन केले आहे. नेरुळ येथील डी.वाय. पाटील संकुलात शुक्रवार, २१ एप्रिल ते रविवार, २३ एप्रिल या कालावधीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील कार्यशाळा, राष्ट्रीय आरोग्य नीती २०१७, वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती व शोध, लव्ह भारत-सर्व्ह भारत तसेच डॉक्टर-पेशंट संबंध अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती गुरुवारी नेरुळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.शुक्रवारी या परिषदेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मागण्या, मते, वैद्यकीय क्षेत्रात हव्या असलेल्या सुविधा, गरजांविषयी चर्चा केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. शनिवार २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेचे यंदाचे तिसरे वर्ष असून २०१५ला रायपूर येथे पहिली परिषद भरविण्यात आली होती आणि त्यानंतर म्हैसूर येथे दुसरी परिषद भरविण्यात आली होती. १५०० हून अधिक विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
आजपासून नेरूळमध्ये राष्ट्रीय परिषद
By admin | Published: April 21, 2017 12:21 AM