पनवेल : पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या बदलीसाठी सत्ताधारी अविश्वास ठराव आणणार आहेत. आयुक्तांच्या समर्थनार्थ शहरातील सामाजिक संघटना एकत्र आल्या असून बुधवारी २१ मार्चला पनवेलमधील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानात जनतेचा विश्वासदर्शक ठराव घेणार आहे. या विश्वासदर्शक ठरावाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.सायंकाळी ६.३० वाजता पनवेलच्या मिडलक्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर सामान्य नागरिकांचा आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ ‘जनतेचा विश्वासदर्शक ठराव’ कार्यक्र माचे आयोजन सामाजिक संस्थांनी संयुक्तपणे केले आहे. या सभेला आयुक्तांच्या समर्थकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे, अशी माहिती आयोजक कांतीलाल कडू, अरुण भिसे, दीपक सिंग, प्रभाकर शिंदे, श्याम फडणीस यांनी दिली. यावेळी पनवेल, खांदा वसाहत, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजे तसेच ग्रामीण भागातील सामाजिक संस्था, लेखक, कवी, शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, विविध रिक्षा चालक संघटनांनी पाठिंबा देवून ते कार्यक्र मात सहभागी होणार असल्याचे आयोजकांना कळविण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या बदलीकरिता सोमवारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.- महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावरील अविश्वासाच्या ठरावावर चर्चा करण्यासाठी सोमवार, २६ मार्च रोजी विशेष महासभा घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर कविता चौतमोल यांनी दिली.विरोधी पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित?पनवेल महापालिका आयुक्तांच्या विरोधात अविश्वासाच्या ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या २६ मार्चच्या विशेष महासभेला विरोधी पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित राहणार आहेत. आम्ही पनवेलमधील स्वयंसेवी संस्थांनी आणलेल्या विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.
आयुक्तांच्या समर्थनार्थ पनवेलमध्ये आज बैठक, अविश्वास ठरावावर २६ मार्चला विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:48 AM