अरविंद म्हात्रे , चिकणघरमहापालिकेत निवडून आलेले भाजपाचे नगरसेवक आता स्वतंत्र नगरपालिका स्थापन होवू नये याकरिता प्रयत्न करित असल्याने २७ गावांच्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची आज (सोमवारी) होणारी सभा गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. या सभेत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पाचारण करण्यात आले असून ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, याकरिता संघर्ष समिती विविध मार्गांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना भाजपाच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. किमान अडीच वर्षे तरी नगरसेवकपदी राहू द्यावे, अशी गळ घातल्याची माहिती संघर्ष समितीला मिळाली. त्यामुळे सोमवारच्या सभेत नगरसेवकपदाचा मोह लागलेल्यांची कसोटी लागणार आहे. १ जून २०१५ च्या अधिसूचनेनुसार २७ गावांचा केडीएमसीत समावेश झाल्याला आठ महिने उलटून गेल्यानंतरही येथे रस्ते, पायवाटा, पिण्याचे पाणी या समस्या जैसे थे असल्याचे चित्र आहे. दरम्यान, २० आॅक्टोबरच्या जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,’ असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते. याचीच री प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही सोनारपाडा येथील संघर्ष समितीच्या प्रचारसभेत ओढली होती. प्रत्यक्षात मात्र अद्याप काहीही हालचाल दिसत नसल्याने ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या नेत्यांना धारेवर धरले असल्याने संघर्ष समितीने आता आक्र मक पवित्रा घेतला आहे. ं‘मुख्यमंत्र्यांवर आमचा आजही विश्वास आहे. सात नगरसेवक जरी भाजपाचे असले तरी त्यांना समितीच्या बरोबर राहावे लागणार आहे. त्यांचे नगरसेवक पद औटघटकेचे असेल, याची आधीच कल्पना आहे. त्यामुळे समिती आणि भाजपा एकत्रितपणे आहेत.’-चंद्रकांत पाटील, सरचिटणीस, २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती‘भारतीय जनता पक्ष २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आहे आणि यापुढेही राहील. २७ गावांबाबतीत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला जाईल.’ -आमदार नरेंद्र पवार, कल्याण (प.)
२७ गावे संघर्ष समितीची आज निर्वाणीची सभा
By admin | Published: February 01, 2016 1:22 AM