नामदेव मोरे, सुर्यकांत वाघमारे, योगेश पिंगळे
नवी मुंबई : आरक्षण मिळेपर्यंत नाेकरी भरती करायची नाही. केलीच तर आमच्या जागा राखून ठेवायच्या. ५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या, यापैकी ३७ लाख जणांना प्रमाणपत्र दिली त्याचा तपशील द्यावा. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अद्यादेश त्वरीत काढण्यात यावा. आज रात्री अद्यादेश काढला नाही तर उद्या १२ वाजता आझाद मैदानावरच जाण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला. आजचा मुक्काम नवी मुंबईतच केला जाणार आहे. अद्यादेश मिळाला तर गुलाल उधळायला आझाद मैदानात नाही काढला तर आंदोलनासाठी जाणारच असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नवी मुंबईमध्ये वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा आंदोलकांबरोबर मनोज जरांगे यांनी संवाद साधला. सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या लेखी आश्वासनांवर चर्चा करण्यात आली. राज्यात ५७ लाख नोंदी सापडल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी ३७ लाख नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. ज्या नोंदी सापडल्या त्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावण्याची मागणीही त्यांनी केली. ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांचा तपशील देण्यात यावा. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले आहे. पण त्याचा अद्यादेश काढलेला नाही. सरकारने आज सायंकाळपर्यंत अद्यादेश काढावा. आज आम्ही नवी मुंबईतच मुक्काम करणार. सकाळपर्यंत अद्यादेश मिळाला नाही तर उद्या १२ वाजता आझाद मैदानात जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एकही मराठा आरक्षणापासून वंचीत राहणार नाही. जर कोणी राहिलाच तर कायमस्वरूपी आरक्षण मिळेपर्यंत त्या कुटुंबातील मुलांचा संपुर्ण खर्च सरकारने करावा. सरकारने मुलींचा खर्च करण्याचे मान्य केले आहे पण मुलांना वाऱ्यावर सोडायचे का याविषयी निर्णय घेण्याची मागणी केली. जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत नोकर भरती करायची नाही व केलीच तर आमची पदे राखून ठेवायची अशी मागणीही त्यांनी केली. अंतरवालीसह राज्यातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावेत अशी मागणीही यावेळी केली. सरकारने तत्काळ अद्यादेश दिले नाहीत तर शनिवारी आझाद मैदानावर जाणारच असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
सरकारने दगाफटका केला तर झाडून सगळे मराठे मुंबईत येतीलआम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. पण सरकारने काही दगाफटका केला तर राज्यातील सगळे मराठे झाडून मुंबईत येतील . यामुळे आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी दिला.
नवी मुंबईकरांनो जेवण पाण्याची व्यवस्था कराशासनाने अद्यादेश दिला नसल्यामुळे आजची रात्र नवी मुंबईमध्येच काढण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांनो आंदोलकांना पाणी व जेवण देण्याची व्यवस्था करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणेसगेसोयऱ्यांना कुणबी नोंदी देण्याचा अद्यादेश सायंकाळपर्यंत देण्यात यावा.
अद्यादेश मिळाला तर गुलाल उधळायला आझाद मैदानात जाणार नाही दिला आंदोलन करण्यासाठी जाणार.
५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्याचा व ३७ लाख प्रमाणपत्र दिल्याचा तपशील द्यावा.
सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देवूनही जे वंचीत राहतील त्या मुलांचा व मुलींचा शिक्षणाचा खर्च सरकारने करावा.
अंतरवालीसह राज्यात आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे.
कायम आरक्षण मिळेपर्यंत नोकरी भरती रद्द करावी, भरती केलीच तर आमच्या जागा राखून ठेवाव्या.
कुणबी नोंदी तपासण्यासाठीच्या शिंदे समीतीला एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी.
सगेसोयऱ्यांसाठीची शपथत्र पुर्णपणे मोफत करण्यात यावी, शपथ पत्राचा भुर्दंड समाजावर लादू नये.
अद्यादेश मिळेपर्यंत शुक्रवारची रात्र नवी मुंबईतच काढण्याचा निर्णय.
अद्यादेश मिळाला नाही तर आझाद मैदानावर जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
सरकारने जे लेखी आश्वासन व अद्यादेश दिले त्यांचा आज रात्रीच अभ्यास करणार.