आविष्कार देसाई , अलिबागमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत असलेल्या चार हजार २३५ महिला बचत गटांना हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. महिला बचत गटासाठी राबविण्यात येणारे अभियान ‘टॉयलेट पिंकथॉन’ या नावाने ओळखले जाणार आहे. या माध्यमातून सुमारे २० हजार शौचालये बांधावी लागणार असल्याने यासाठी २४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेकडे फक्त सात कोटींचा निधी असल्याने हे अभियान पूर्ण कसे करायचे, असा प्रश्न पडला आहे.२०१९ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करायचा आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत वेगाने कामे करण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाच्या माध्यमातून चार हजार २३५ महिला बचत गट जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. २५ आॅक्टोबर ते ८ मार्च १५ या कालावधीत १ हजार ९३६ शौचालये बांधण्यात आली असून, ४३४ बचत गट हागणदारीमुक्त झाले आहेत. अद्यापही तीन हजार ८०१ बचत गट हागणदारीमुक्त करणे बाकी आहे.१५ जानेवारी ते ८ मार्च २०१६ या कालावधीमध्ये सुमारे २० हजार शौचालये बांधावी लागणार आहेत. शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याला गुलाबी रंग देण्यात येणार असून, हे अभियान ‘टॉयलेट पिंकथॉन’ या नावाने ओळखले जाणार आहे.सरकारकडून एका शौचालयासाठी १२ हजार रुपये देण्यात येतात. याचा हिशेब केल्यास २० हजार शौचालयांसाठी सुमारे २४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. विशेष म्हणजे पाणी व स्वच्छता विभागाकडे या वर्षीसाठी फक्त सात कोटी रुपयेच शिल्लक आहेत. त्यामुळे निधीअभावी हे शिवधनुष्य पेलणार कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्वच्छ भारत मिशन हा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या कामासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
‘टॉयलेट पिंकथाँन’ला हवेत २४ कोटी
By admin | Published: January 26, 2016 2:06 AM