नवी मुंबई : नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येते; परंतु मोहीम संपल्यावर स्वच्छतेचा विसर पडत असून, यामुळे लाखो रु पये खर्च करून बांधलेल्या प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. प्रसाधनगृहांची स्वच्छता होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रसाधनगृह असताना नागरिकांनी त्याचा वापर बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविली जात आहे. नवी मुंबई महापालिकेने शहर सुशोभित करण्यासाठी स्वच्छता, सुशोभीकरण, रंगरंगोटी, सार्वजनिक शौचालये. ई-टॉयलेट, शी-टॉयलेट असे विविध उपक्र म राबविण्यात येतात. या मोहिमेत नागरिकांचाही सहभाग असावा, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
२१ व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराने स्वच्छतेत राज्यात पहिला क्र मांक पटकाविला आहे. या मोहिमेसाठी दरवर्षी महापालिकेच्या माध्यमातून लाखो रु पये खर्च केले जातात. अनेक ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत. स्वच्छता मोहिमेत या प्रसाधनगृहांना रंगरंगोटी केली जाते. प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबरोबर विविध साहित्य पुरविण्यात येते. मोहीम संपल्यावर मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नेरुळमधील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि रु ग्णालय परिसरात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता होत नाही, त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. स्वच्छता मोहिमेमध्ये ज्या प्रकारे स्वच्छता केली जाते, त्याप्रमाणे प्रसाधनगृहांची महापालिकेने नियमित स्वच्छता करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.