ऐरोलीत पाणीपुरीसाठी वापरले शौचालयाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 03:13 AM2020-11-30T03:13:07+5:302020-11-30T03:13:12+5:30
ऐरोली सेक्टर १६ येथील वेलकम स्वीट्स येथे शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्या ठिकाणी विकल्या जात असलेल्या पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पाणी शौचालयातून घेतले जात असल्याचे काहींच्या निदर्शनास आले होते.
नवी मुंबई : पाणीपुरीसाठी शौचालयाच्या पाण्याचा वापर होत असल्याचा प्रकार ऐरोलीत उघडकीस आला. या प्रकरणी नागरिकांनी व्यावसायिकाला धारेवर धरले असता त्याने घडला प्रकार मान्य केला. या प्रकारामुळे त्या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऐरोली सेक्टर १६ येथील वेलकम स्वीट्स येथे शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्या ठिकाणी विकल्या जात असलेल्या पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पाणी शौचालयातून घेतले जात असल्याचे काहींच्या निदर्शनास आले होते. ही बाब समाजसेवक शिवाजी खोपडे, बापू पोळ यांना समजली असता सहकाऱ्यांसह त्यांनी त्या ठिकाणी धडक दिली. या वेळी दुकानाशेजारीच असलेल्या शौचालयाच्या नळाचे पाणी पाणीपुरीसाठी तसेच भांडी धुण्यासाठी वापरले जात असल्याचे आढळून आले. तर पाणीपुरीसाठी वापरली जाणारी भांडीदेखील शौचालयात आढळली. या प्रकारावरून उपस्थितांनी दुकानदाराला धारेवर धरले असता, त्याने घडल्या प्रकारची कबुली देत माफी मागितली.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
या प्रकारावरून नागरिकांच्या आरोग्यासोबत व्यावसायिक खेळत असल्याचे दिसून आले. सध्या कोरोनामुळे स्वच्छतेला महत्त्व दिले जात आहे. पण हा व्यावसायिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.