महामार्ग हस्तांतरणाचा तिजोरीवर भुर्दंड, टोल वसुली ठेकेदाराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:13 AM2017-10-30T01:13:40+5:302017-10-30T01:13:51+5:30

वाशी ते बेलापूर दरम्यान १४ किलोमीटरचा सायन - पनवेल महामार्ग हस्तांतर करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Toll Recovery Contractor | महामार्ग हस्तांतरणाचा तिजोरीवर भुर्दंड, टोल वसुली ठेकेदाराकडे

महामार्ग हस्तांतरणाचा तिजोरीवर भुर्दंड, टोल वसुली ठेकेदाराकडे

Next

नामदेव मोरे
नवी मुंबई : वाशी ते बेलापूर दरम्यान १४ किलोमीटरचा सायन - पनवेल महामार्ग हस्तांतर करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रोडवरील दिवाबत्ती, देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पालिकेवर येणार असून वर्षाला करोडो रुपये खर्च करावे लागणार आहेत. पालिकेच्या तिजोरीवर भुर्दंड पडणार असून खारघर टोलचे उत्पन्न मात्र ठेकेदाराच्या खिशात जाणार आहे.
वाहतूककोंडी व अपघात कमी व्हावे यासाठी शासनाने २५ किलोमीटर लांबीच्या सायन - पनवेल महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. १२०० कोटीपेक्षा जास्त खर्च करून रूंदीकरण करण्यात आले असून ६ जानेवारी २०१५ पासून खारघरमध्ये टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. ठेकेदाराने ८० टक्के काम पूर्ण केले असून उर्वरित २० टक्के काम अद्याप पूर्ण केलेले नाही. शासनाने टोलमधून लहान वाहनांना सूट दिल्यामुळे नुकसान होत असल्याचे कारण देवून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. रखडलेल्या कामांमुळे महामार्गावरील प्रवाशांना प्रचंड गैरसोयींना सामोेरे जावे लागत आहे. तुर्भे पोलीस स्टेशनजवळील पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. शिरवणे, नेरूळ, उरण फाटाजवळील पादचारी भुयारी मार्गांचे काम अर्धवट राहिले आहे. कामोठेजवळ रूंदीकरणाचे व भुयारी मार्गांचे कामही रखडले आहे. पावसाळ्यात पडलेले खड्डेही ठेकेदार वेळेत दुरूस्त करत नाही. यामुळे जून ते आॅगस्ट दरम्यान वाशी ते बेलापूर दरम्यान रोज प्रचंड वाहतूककोंडी होवू लागली होती. महामार्गावरील पथदिवेही वारंवार बंद असल्यामुळे अपघातांमध्ये वाढ होवू लागली होती. महामार्गावरील प्रवास म्हणजे डोकेदुखी ठरू लागली होती. रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्याप्रमाणात डेब्रिज टाकले जात असल्यानेही पालिकेसाठी डोकेदुखी ठरू लागली होती. फिफाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने महामार्गावर सुशोभीकरणाची कामे केल्यामुळे हा रोड हस्तांतर करून घेण्याची मागणी होवू लागली होती.
महापालिकेने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. महामार्गावरील जंगली झाडेझुडपे, डेब्रिज, खड्डे, बंद पथदिवे यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. देखभाल दुरूस्तीसाठी महापालिका शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत असते. परंतु निधी नसल्याचे कारण देवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नाही. यामुळे महामार्ग हस्तांतर करून घेतल्यास त्याची योग्य देखभाल करणे महापालिकेला शक्य होईल. साफसफाई, खड्डे, दिवाबत्ती, भुयारी व पादचारी मार्गांचे देखभाल करणे महापालिकेला शक्य होणार आहे. वास्तविक महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा ठेका सायन-पनवेल टोलवेज कंपनीला दिला आहे. टोल ठेकेदार वसूल करणार व ६० टक्के रोडची देखभाल दुरूस्ती महापालिका करणार हे विसंगत असल्याचे स्पष्ट होत असून पालिकेला करोडोेचे नुकसान होणार आहे.

मनपा क्षेत्रातून १४ किलोमीटर लांबीचा सायन - पनवेल महामार्ग जात आहे. त्याची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. ठेकेदाराच्या माध्यमातून या रोडचे रूंदीकरण करण्यात आले असून खर्च वसुलीसाठी खारघरमध्ये टोल बसविण्यात आला आहे. टोल वसुली ठेकेदार करणार व ६० टक्के रोडची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी करोडो रूपये पालिका खर्च करणार आहे. हा भुर्दंड पालिकेने का सहन करायचा, हस्तांतर करायचेच असेल तर टोलमधील उत्पन्नही पालिकेला मिळाले पाहिजे, अशी मागणी होवू लागली आहे.

रखडलेली कामे
कोण पूर्ण करणार?
महामार्गावर तुर्भे पोलीस स्टेशनजवळील पादचारी पुलाचे काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. सर्वच पादचारी भुयारी मार्गांचे काम रखडले आहे.
रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च होणार आहेत.
पालिकेने हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली तर रखडलेली कामे कोण करणार असा प्रश्नही उपस्थित होवू लागला आहे.

६ उड्डाणपुलांचा समावेश : महापालिका क्षेत्रामध्ये महामार्गावर वाशी, सानपाडा, सानपाडा दत्तमंदिर, नेरूळ, उरण फाटा व बेलापूर असे सहा मोठे उड्डाणपूल आहेत. याशिवाय वाशी व शिरवणेमध्ये दोन छोटे पूल आहेत. वाशी, दत्तमंदिर, नेरूळ व सीबीडीमधील पूल जुने असून भविष्यात त्यांचे दुरूस्ती किंवा पुनर्बांधणी करायची वेळ आली तर हजारो कोटी रूपयांचा भुर्दंड पालिकेवर पडणार आहे.

Web Title: Toll Recovery Contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.